Thursday, January 8, 2026

जेथे भाव तेथे देव

जेथे भाव तेथे देव

अर्चना सरोदे, मनाचा गाभारा

देव लाकडात, पाषाणात किंवा मातीत नसतो, देव भावात असतो म्हणून त्याच्या प्रति असलेला भाव महत्त्वाचा. ‘भाव तेथे देव’ ही म्हण आपल्याला माहीत आहे. माणसाचं जीवन विचाराने कमी तर भावाने अधिक व्यापलेले असते. मनुष्य बुद्धिमान प्राणी जरूर आहे पण त्याचे भाव विश्व त्याच्या बुद्धीवर, विचारांवर मात करते. तुमचे दैनंदिन जीवन व्यतीत करताना कित्येक वेळा भावना तुमच्या विचारांवर मात करतात. आपण घृणा करतो, क्रोध करतो, प्रेम करतो हे सारे करताना भावना प्रबळ असतात, आपले विचार तिथे गौण ठरतात.तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात...

'आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाहीं ऐसा मनीं अनुभवावा '

हा अभंग देव आहे किंवा नाही याच्याशी जोडलेला नसून त्याच्या स्वरूपाशी जोडलेला आहे, म्हणजेच तुकोबांनी देवाच्या स्वरूपाचे वर्णन यात केलेले आहे आणि स्वरूपाचे वर्णन केले म्हंटल्यावर देवाचे अस्तित्व आलेच; परंतु सर्वात आधी देव आहे की नाही हे आकळण्यासाठी मायेच्या पल्याड पाहावे लागते आणि ते पाहण्यासाठी आधी मनी भाव हवा आणि भाव नुसता असून कामाचा नाही, तर तो शुद्ध आणि भोळा असणे देखील तितकेच गरजेचे आहे, याचाच दुसरा अर्थ असा की येथे ज्ञानी होण्यासाठी अध्यात्माविषयी वाचन किंवा त्याची पारायणे करण्याची गरज नाही, कारण त्याने फक्त शब्दज्ञान मिळते, देवाप्रती भाव बळकट होत नाही. याचाच अर्थ असा की देवाप्रती भाव बळकट होण्यासाठी त्याच्याप्रती आधी दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी, तो अस्तित्वात आहे की नाही असा संदेह मनी असता कामा नये, उलट चराचरात त्याचा वास आहे एवढी गाढ श्रद्धा हवी आणि तसे जर असेल तर आणि तरच मनुष्याला मग खऱ्या अर्थानेच सर्व चराचरात तो दिसू लागतो किंबहुना तशी त्याला अनुभूतीच येऊ लागते आणि अशाच अनुभूतीने मग ज्ञान मिळण्यास मदत होते. म्हणजेच याच दृढ विश्वासाच्या मोबदल्यात देवाला भक्तास अंती ज्ञान द्यावे लागते आणि म्हणूनच संत नेहमी म्हणतात की, बोध किंवा आत्मबोध हा कधीही ज्ञानाने होत नाही, तर तो भावानेच होतो आणि असा हा बोध किंवा ज्ञान झाल्यावरच मग त्याला ज्ञानदृष्टी लाभते जेणेकरून मग त्याला जे सामान्यांना दिसत नाही ते दिसू लागते. (म्हणजेच आधी फक्त त्याची श्रद्धा असते की चराचरात देव आहे आणि तशी ती श्रद्धा, तो विश्वास तो कोणत्याही परिस्थिती ढळू देत नाही आणि म्हणूनच ती श्रद्धाच मग त्याला खऱ्या अनुभूतीकडे घेऊन जाते आणि त्याला चराचरात देव दिसू लागतो. असा कोणता पदार्थ आहे किंवा कोणती अशी वस्तू आहे ज्यात देव नाही, म्हणजेच जेथे चराचरात देवाचा वास आहे, त्याचे अस्तित्व आहे मग तो दगडात का असणार नाही; परंतु ज्याच्या ठायी भावच नाही त्यांना हे पटत नाही किंबहुना सांगून देखील काहीही फायदा होत नाही...

संतांनी सुद्धा सगुण भक्तीला प्राधान्य दिले आहे कारण त्यांनी स्वतः ठायी देवाप्रती भाव एवढा दृढ केला आहे की त्या भावाच्या बळावर किंवा त्याच्या जोरावर मग ते कशातही देव पाहू शकतात. जो खरा भक्त असतो त्याच्या ठायी देवासाठी किंवा देवाप्रती जो भाव असतो तो अधिक दृढ असतो किंबहुना तो एवढा शुद्ध असतो की त्या भावातच भगवंत वास करतो.

म्हणजेच हा भाव इतका निर्मळ असतो की त्या भावात आणि भगवंतात काहीही फरक राहत नाही, तो भावच भगवंत होऊन जातो. देवाच्या कृपेचा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल, तर मनात शुद्ध भाव लागतो, किंबहुना असेच भक्त देवाच्या कृपाप्रसादाचे खरे अधिकारी असतात किंवा मानकरी ठरतात. म्हणजेच त्यांना अनुभव देखील तेवढेच अलौकिक असे येतात.

खरं सांगायचं झालं, तर भगवंत फक्त आणि फक्त तुमच्या ठायी उद्भवणाऱ्या भावाचा भुकेला असतो, प्रेमाचा भुकेला असतो आणि म्हणून आपल्याला जसे जमेल किंवा जसे शक्य होईल तसे त्याचे नामस्मरण करत राहावे. पारायणे करायचीच असतील, तर नामस्मरणाची करावीत. तसेच आपल्याला देवाजवळ काही मागायचे असेल, तर त्याच्याकडे त्याच्या आवडीची भक्तीच मागावी कारण आपण देवाला जर का काही देऊ शकतो तर ते फक्त आणि फक्त प्रेमच आणि देवाला देखील तेवढेच हवे असते, इतर मायिक पदार्थ त्याला रुचत देखील नाहीत आणि मुख्य म्हणजे तुमच्या ठायी जन्माला येणाऱ्या या शुद्ध भावामुळेच मग तुम्हांला जे काही अनुभव येऊ लागतील त्याने मग तुमचा त्याच्यावरचा विश्वास अजूनच दृढ होऊन त्याद्वारे तुमची त्याच्याप्रती प्रीतीची आणि प्रेमाची भावना अधिकच वाढीला लागेल, जोर धरेल किंबहुना दिवसेंदिवस ती अधिक बळावत जाईल. तुम्हाला जर का हे साध्य करायचे असेल तर त्यासाठी लागणारा मनाचा निर्धार दिवसेंदिवस ठाम असू द्यावा, कोणत्याही कारणासाठी मग तो ढळू न द्यावा. भक्तांचा हा भाव पाहून हा कृपावंत त्याच्या भक्तांचे सर्व मनोरथ पुरवितो, त्यांनी इच्छिलेले सर्व त्यांच्या पदरात टाकतो.

Comments
Add Comment