श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाडा : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस वर्षीय तरुणीला तीन लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली असून श्रमजीवी संघटनेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. सुनील गायधनी (वय ३१), सुमन गायधनी, वाघमारे नावाचा इसम व रघुनाथ दुधवडे अशी आरोपींची नावे आहेत.
तालुक्यातील गारगांव येथील एका वीस वर्षीय तरुणीचा विवाह नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातील वडगांव पिंगळा येथील सुनील गायधनी या तरुणाशी ९ मे २०२४ रोजी झाला होता. प्रारंभी त्यांचा संसार चांगला चालला होता. त्यानंतर घरामध्ये वाद सुरू झाले. या वादातून त्या तरुणीला टोमणे मारणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, शेजारी लोकांशी बोलून न देणे असे प्रकार नवरा व सासुने सुरू केले. त्यानंतर तीन महिन्यांनंतर ही तरुणी माहेरी आली. एक महिना माहेरी राहिल्यानंतर नवऱ्याचे नातेवाईक तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले व ती पुन्हा सासरी गेली. त्यानंतर नवरा व सासू तिच्याशी नेहमीच भांडू लागले. तू आमच्या घरी राहू नकोस. तुझे लग्न करण्यासाठी वाघमारे व रघुनाथ दुधवडे यांना ३ लाख रुपये दिले होते. आम्हाला ते पैसे परत दे व येथून निघून जा, असे नेहमीच सासरची मंडळी बोलत असत.
२० जून २०२५ रोजी या तरुणीने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिला माहेरी घेऊन गेले. सात-आठ महिन्यांत सासरच्या मंडळींचा तिला एकही फोन कॉल आला नाही. ६ जानेवारी रोजी नवरा, सासू, नणंद आदी नातेवाईक तिला वडगाव येथे घेऊन जाण्यासाठी आले. मात्र सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिला सासरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर तू नाही आलीस तरी चालेल, आमचा मुलगा आम्हाला दे असे बोलू लागले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, तालुका अध्यक्ष भरत जाधव, सुजाता पारधी, मीरा टोकरे या कार्यकर्त्यांनी तरुणीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठून पती सासु व इतरांवर गुन्हा दाखल केला.