Thursday, January 8, 2026

रविवारी ठाकरे बंधूंची, तर सोमवारी महायुतीची शिवाजी पार्कवर सभा

रविवारी ठाकरे बंधूंची, तर सोमवारी महायुतीची शिवाजी पार्कवर सभा

महापालिकेकडून सभांसाठी अटींचे पालन करण्याचे निर्देश

मुंबई : राजकीय पक्षांसाठी शिवाजी पार्कवरील सभांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेला शिवाजी पार्कवर ११ तारखेची परवानगी देण्यात आली आहे. शिवसेना भाजप यांच्या संयुक्त सांगता सभेला १२ जानेवारीची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गर्जना ऐकायला मिळेल. शिवसेना ठाकरे गट, मनसे, शिवसेना आणि भाजप या चार पक्षांनी शिवाजी पार्क मैदान ११, १२ जानेवारीला सांगता सभेसाठी मिळावे यासाठी मुंबई महापालिकेला पत्र दिले होते.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने विरोधकांपुढे ही निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान असणार आहे. अशातच मुंबई महापालिकेने ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला परवानगी दिली आहे. ११ जानेवारीला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे; परंतु महापालिकेकडून या सभेसाठी तब्बल २४ अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून यंदा ठाकरे बंधू एकत्र आल्याने ठाकरे विरुद्ध भाजप-शिवसेना अशी थेट लढत होत आहे. दोन्ही युतीच्या पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >