मोहित सोमण: आजचे शेअर बाजार सत्र हे गुंतवणूकदारांसाठी धीरगंभीर राहिले आहे. अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ७८०.१८ अंकांने घसरला असून ८४१८०.९६ पातळीवर स्थिरावला आहे तर निफ्टी २६३.९० अंकांने घसरत २५८७६.८५ पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळे सेन्सेक्स ८४२०० व निफ्टी २५९२० पातळीही गाठण्यास अयशस्वी ठरला आहे. जागतिक दबावाचा फटका आज शेअर बाजारात प्रभावीपणे बसल्याने इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. त्यामुळे सलग आठव्या सत्रात शेअर बाजार घसरले आहे. युएस कडून संभावित ५००% टॅरिफ, जागतिक भूराजकीय दबाव, कमोडिटीतील डॉलर रूपये अस्थिरता, युएस बाजारातील कमकुवत आकडेवारी, निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सेल ऑफ दबाव, आणि मिड स्मॉल कॅप शेअर्समध्येही झालेली पडझड अशा विविध कारणांमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग झाले आहे. बँक निर्देशांकानेही आपला कल घसरणीकडेच असल्याचे स्पष्ट केले.
आयटी, मेटल, पीएसयु बँक, तेल व गॅस, ऑटो, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बाजार लाल रंगातच बंद झाला आहे. खासकरून आज अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) ६.५८% उसळला असल्याने बाजारातील घसरणीचा अंडकरंट स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान बाजारातील घरगुती गुंतवणूकदारांनी आपली खरेदी वाढल्याची शक्यता असल्याने सलग तिसऱ्या दिवशी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेतलेल्या धक्क्याला ही गुंतवणूक पचवेल असा कयास आहे. ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्येही आज मोठी घसरण झाली आहे ज्यामध्ये टीसीएस, हिंदाल्को, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स सारखे शेअर घसरले आहेत. दरम्यान आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक अशा शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाल्याचा बाजारात आधार मिळाला.
निफ्टी व्यापक निर्देशांकातील (Nifty Broader Indices) निफ्टी १००, निफ्टी २००,स्मॉलकॅप १००, स्मॉलकॅप २५० निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. त्यामुळे आज बाजारात 'व्हाईट वॉश' झाल्याचे अधिक स्पष्ट होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी आज सोशल मिडियावर पोस्ट करत ५००% अतिरिक्त शुल्क बीलाला ट्रम्प हे मान्य करु शकतात म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात या घडामोडींचा दबाव निर्माण झाला. विशेषतः मेटल, आयटी, कंज्यूमर ड्युरेबल्स या शेअर्समध्ये तणाव वाढला. दुसरीकडे युएस व्हेनेझुएला यांच्यातील युद्ध सदृश्य परिस्थिती असताना गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारातही संमिश्रित प्रतिसाद दिला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज किरकोळ घसरण झाली आहे. तर युएसने व्हेनेझुएलावर ताबा घेतलेला असताना कच्च्या तेलाच्या वाढत्या पुरवठ्याच्या संभाव्यतेमुळे कच्च्या तेलात घसरण सुरू होती. मात्र युएसकडून रशियावरील तेलाबाबत सुरु केलेल्या निर्बंधासह इतर भूराजकीय अस्थिरतेत किंमतीत १% वाढ झाली आहे. सोनेचांदीतही अस्थिरतेसह आगामी पेरोल डेटातील आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने कमोडिटीतील किंमती तुरळक घसरल्या आहेत. या घडामोडीचा बाजारात परिणाम होत असताना गिफ्ट निफ्टी सह आशियाई बाजारातही मोठी घसरण झाली आहे. कोसपी वगळता इतर सगळ्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स, एस अँड पी ५०० बाजारात घसरण झाली असून नासडाक कंपोझिट निर्देशांकात किरकोळ वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ अल्काईल (४.५०%), इंडिया सिमेंट (४.३८%), निवा बुपा हेल्थ (४.१७%), ट्रायडंट (३.२२%), सोभा (२.६८%), आयडीएफसी फर्स्ट बँक (१.३८%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण भेल (१०.४८%), सिग्नेचर ग्लोबल (१०.२९%), टीआरआयएल (९.२५%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (७.४१%), हिन्दुस्तान झिंक (६.२३%), हिंदुस्थान कॉपर (५.३३%) समभागात झाली आहे.






