मुंबई : घाटकोपर- अंधेरी- घाटकोपर या मेट्रो-१ मार्गिकतील सर्व बारा मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) खासगी कंपन्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेमुळे महिला प्रवाशांची प्रवासादरम्यानची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) फेमटेक आणि महिलांच्या आरोग्यासाठीची उत्पादने तयार करणाऱ्या सिरोना या कंपनीशी भागीदारी करून मेट्रो-१ मार्गिकवरील १२ मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन बसवले आहे. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्यादृष्टीने महिला प्रवाशांना आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे यंत्र बसविण्यात आले आहे. परवडणाऱ्या दरात मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅडसह अन्य काही वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तेथे दहा रुपयांत दोन सॅनिटरी पॅड तेथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ४० रुपये किमतीचे दोन सॅनिटरी पॅड १० रुपयात उपलब्ध करून देतानाच १० सॅनिटरी पॅडचे पाकिट ७० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे. १० सॅनिटरी पॅडची किंमत १५० रुपये अशी असताना महिला प्रवाशांना हे पाकीट केवळ ७० रुपयांत दिले जात आहे.
याशिवायही इतर अनेक वस्तू माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मेट्रो प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. अशा वेळी महिला प्रवाशांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेच्यादृष्टीने आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १२ मेट्रो स्थानकांवर सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आल्याची माहिती एमएमओपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी यांनी सांगितले.
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १ मार्गिकवरील वर्सोवा, डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी (पश्चिम), वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, चकला, एयरपोर्ट रोड, मरोल नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर आणि घाटकोपर मेट्रो स्थानक अशा १२ मेट्रो स्थानकावर एमएमओपीएलने फेमटेक आणि सिरोना कंपनीच्या मदतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवली आहेत.






