Thursday, January 8, 2026

समर्थ रामदास

समर्थ रामदास

- डॉ. देवीदास पोटे

पेरिले ते उगवते पेरिले ते उगवते। बोलल्यासारिखे उत्तर येते। तरी मग कर्कश बोलावे ते। काय निमित्त ।। - समर्थ रामदास (दासबोध - दशक १२)

समर्थ रामदास या रचनेत म्हणतात, 'जे आपण पेरू तेच उगवते'. हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे. आपण जसे इतरांशी बोलू, त्याप्रमाणेच उत्तर येते. मग उगाच कटू वा कर्कश बोलण्याचे प्रयोजनच काय? समर्थ रामदास निसर्गाचा महत्त्वाचा नियम सांगत आहेत. आपण जमिनीत जे बीज पेरू तेच फळरूपाने वा धान्यरूपाने उगवते, हे निसर्गाचे तेत्त्व आहे. गव्हाचे बीज पेरले तर गव्हाचेच पीक येते. हे झाले शेतीतील पिकाबाबत. आयुष्याच्या इतर क्षेत्रातही हाच नियम लागू आहे. आपण कुठल्याही कामाचे नियोजन वा आखणी व्यवस्थित, नियमबद्ध आणि काटेकोरपणे केली तर त्या कामाचा परिणाम वा रिझल्ट चांगलाच येणार यात शंकाच नाही. याउलट कामाची आखणी मुळातच अजागळ, अव्यवस्थित वा नियमबाह्य असेल त्या कामाचा अंतिम परिणाम हानिकारक होणार, हे निश्चित.

हे तत्त्व जसे व्यवहारातील कामांच्या बाबतीत लागू आहे तसेच माणसामाणसातील नात्यांबद्दलही लागू आहे. आपण प्रेमाने वागलो तर त्याचा प्रतिसाद प्रेमयुक्त शब्दांनीच येतो. प्रेमाचा अनुबंध पेरला तर त्याला प्रेमाचेच उत्तर येते. 'बोलिल्यासारखे उत्तर येते' या ओळीतून समर्थांनी हाच आशय सांगितला आहे.

प्रेम ही एक मोठी शक्ती आहे. मानवी मनाच्या उदात्त भावनेची ती विश्वात्मक आवृत्ती आहे. प्रेमाच्या शब्दांनी माणूस माणसाशी जोडला जातो. प्रेमाने जर सारे काही शक्य होते तर कटू बोलण्याचे कारण काय असे समर्थ म्हणतात. प्रेम हे अमृतमय आहे तर द्वेष हा विषम आहे. कटू बोलण्यामुळे माणसाचे मन दुखावते. नात्यानात्यात दुरावा निर्माण होतो. अकारण गैरसमज निर्माण होतात. त्यातून, द्वेष, असूया, कटुता या भावना निर्माण होतात. त्याचा परिपाक अनेकदा अनिष्ट, हानिकारक घटनांमध्ये होतो. चांगले बोलणे म्हणजे आपल्या आयुष्यातील यशाची आणि सुखाची गुरुकिल्ली आहे, असा संदेश समर्थांनी या रचनेद्वारा जनलोकांना दिला आहे.

Comments
Add Comment