Friday, January 9, 2026

Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज नालासोपारा (पूर्व) येथील अचोळे संकेश्वर नगर परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली आणि सभा पार पडली. यावेळी प्रभाग क्रमांक १५ आणि २१ मधील उमेदवारांसाठी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

रॅलीला जनसागराचा प्रतिसाद

नितेश राणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा आणि भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. "येणाऱ्या १५ जानेवारीला केवळ मतदान करायचे नाही, तर वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला विजयी करायचे आहे," असे आवाहन राणे यांनी यावेळी केले. नालासोपाऱ्यातील रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवरून त्यांनी स्थानिक विरोधकांवर निशाणा साधला.

विकासाचे व्हिजन आणि हिंदुत्वाचा हुंकार

सभेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, "वसई-विरारला गुंडगिरी आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करून खऱ्या अर्थाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. प्रभाग १५ आणि २१ मधील आमचे उमेदवार हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत." यावेळी त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही उपस्थितांमध्ये उत्साह भरला. यावेळी व्यासपीठावर स्थानिक भाजप पदाधिकारी, महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नितेश राणे यांच्या या झंझावती दौऱ्यामुळे नालासोपाऱ्यातील निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >