हवा दक्षिण मुंबईची
सचिन धानजी : उच्चभ्रू, मध्यमवर्गीय कष्टकरी अशाप्रकारे बहुभाषिकांचा समावेश असलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर उबाठा आणि भाजपचे प्राबल्य आहे. सन २०१९ प्रमाणेच सन २०२४ मध्ये उबाठा, भाजपने आपल्या जागा कायम राखल्या. त्यामुळे या लोकसभेतील शिवडी आणि वरळी विधानसभेत भाजपला अद्यापही खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शिवडीमध्ये अनिल कोकीळ यांच्या माध्यमातून भाजपला खाते उघडता येईल, तर शिवसेनेला वरळीत दोन जागा मिळवता येईल असा प्राथमिक अंदाज आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, मलबारहिल, भायखळा, शिवडी आणि वरळी या सहा विधानसभांचा समावेश आहे. यामध्ये उबाठाचे तीन आमदार, भाजपचे दोन आणि एक काँग्रेसचा आमदार निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत हेच संख्याबळ होते. या सहा विधानसभांमध्ये एकूण ३२ नगरसेवकांचे प्रभाग आहेत. सन २०१७ मध्ये निवडून आलेले आणि इतर अशाप्रकारे भाजपचे ११, शिवसेनेचे ०५, उबाठाचे १२, तर काँग्रेसचे दोन, सपा एक आणि अभासे एक अशाप्रकार संख्या बळ आहे. त्यामुळे कुलाबा, मुंबादेवी आणि मलबारहिल या विधानसभेत भाजप आणि शिवसेनेचे प्रस्थ असले तरी शिवडी,वरळी आणि भायखळ्यात भाजप आणि शिवसेनेला आपली ताकद दाखवता आलेली नाही. या तिन्ही विधानसभांमध्ये उबाठाची ताकद आजही कायम आहे. बहुभाषिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईत कुलाबा आणि मलबार हिल या परिसरात उच्चभ्रू लोकवस्ती आहे. गुजराती आणि मराठी अशी लोकवस्ती अधिक आहे. तर गिरगाव, ऑपेरा हाऊस या भागात मराठी आणि गुजराती, मारवाडी अशी लोकवस्ती आहे. तर उमरखाडी, भायखळा आणि नागपाडा या भागांमध्ये मुस्लीम बहुल तसेच मराठीही लोकवस्ती आहे. तर परळ, वरळी, शिवडी या भागांमध्ये मराठी कष्टकरी मध्यमवर्गीय अशी लोकवस्ती आहे. त्यामुळे मराठी, गुजराती, मुस्लिम तसेच मागासवर्गीय मतदार आदींचा असा हा मतदार संघ आहे. या मतदारसंघातील नागपाडा, मस्जिद बंदर, उमरखाडी,चिराबाजार, काळबादेवी, वरळी, शिवडी आणि परळ आदी भागांमध्ये म्हाडाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारती अशा प्रमुख समस्या आहेत.
कुलाबा विधानसभा क्षेत्र
या विधानसभेत पुन्हा एकदा भाजपचे राहुल नार्वेकर हे निवडून आले आहेत. या कुलाबा विधानसभेत सध्या भाजपचे ३, शिवसेना एक आणि काँग्रेसचे एक अशाप्रकारे पाच नगरसेवक संख्या होती. या प्रभागात आता भाजपचे चार प्रभागांमध्ये तर शिवसेनेच्या एका प्रभागात उमेदवार उभे आहेत.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २२५: हर्षिता नार्वेकर,(भाजप) विरुध्द सुजाता सानप,(शिवसेना) अजिक्य धात्रक,(उबाठा)
प्रभाग २२६
मकरंद नार्वेकर,(भाजप) तेजल दिपक पवार (अपक्ष)
मुंबादेवी विधानसभा क्षेत्र
या मतदार संघात पुन्हा एकदा काँग्रेसचे अमित पटेल हे निवडून आले आहेत. या विधानसभेत भाजप ०३, आणि काँग्रेस ०२ अशाप्रकारे संख्या बळ होते. तर पाच प्रभागांपैकी तीन जागांवर भाजपा आणि दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २१३
आशा मामिडी,(शिवसेना), श्रध्दा सुर्वे,(उबाठा), नसीमा जावेद जुनेजा,(काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २१६
गौरी राजेंद्र नरवणकर,(भाजप), राजेश्री नगर (मनसे़) राजेश्री भाटणकर,(काँग्रेस)
प्रभाग २२३
प्रिया पाटील, (शिवसेना), प्रशांत गांधी (मनसे), ज्ञानराज निकम (काँग्रेस), आफरीन शेख (समाजवादी पक्ष)
मलबारहिल विधानसभा
या मतदार संघात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे निवडून आलेले आहेत. हा मतदार संघ भाजपाचा गड मानला जातो. यामध्ये पाच पैंकी ४ नगरसेवक भाजपचे तर एक उबाठाचा एकमेव नगरसेवक निवडून आले होते. आता या विधानसभेतील पाचही जागांवर भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २१५
संतोष ढाले,(भाजप ) किरण बाळसराफ,(उबाठा) भावना कोळी,(काँग्रेस) अरुण वाघ, (अपक्ष)
प्रभाग क्रमांक २१७
गौरव झवेरी,(भाजप), निलेश शिरधनकर,(मनसे) रविकांत बांवकर,(काँग्रेस)
भायखळा विधानसभा
या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि आता मनोज जामसुतकर हे निवडून आले आहेत. या मतदारसंघात भाजप ०१, शिवसेना ०१, उबाठा ०२, अभासे ०१ आणि समाजवादी पक्ष ०१ अशाप्रकारे नगरसेवक संख्या होती. मात्र,आता या मतदारसंघात भाजपने चार जागांवर उमेदवार जाहीर केले होते. त्यातील प्रभाग क्रमांक २११ आणि २१२मध्ये उमेदवार वेळेवर पोहोचू शकला नाहीतर एकाचा अर्ज अपुऱ्या कागदपत्रांअभावी स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये महायुतीचा उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. तर प्रभाग क्रमांक २१०मध्ये शिवसेनेच्या शाखाप्रमुखाला भाजपच्यावतीने उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर शिवसेनेच्यावतीने दोन जागावंर उमेदवार उभे आहेत. तर भायखळ्यात मनसेचे उमेदवार तीन जागांवर उभे आहेत. तर प्रभाग क्रमांक २११मधून उबाठानेही आपला उमेदवार दिलेला नाही.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २०७
रोहिदास लोखंडे(भाजपा), शलाका हरियाण(मनसे), योगितागवळी(अभासे) चंद्रशेखर कानडे (वंचित बहुजन), सौरभ पेडणेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)डॉ मयुरी संतोष शिंदे (अपक्ष)
प्रभाग क्रमांक २०८
विजय लिपारे, (शिवसेना), रमाकांत रहाटे,( उबाठा) सतीश खांडगे, (काँग्रेस) मंगेश बनसोड, (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक २०९
यामिनी जाधव,( शिवसेना ) हसीना माईणकर, (मनसे) राफिया अब्दुल दामिडी, (काँग्रेस) सिमा मुल्ला, (समाजवादी पक्ष)
प्रभाग क्रमांक २१०
संतोष राणे, (भाजप ) सोनम जामसूतकर, (उबाठा) अनिल वाजे, (काँग्रेस) दिनेश सरोदे, (बसपा) मोहम्मद कुरेशी (समाजवादी पक्ष)
शिवडी विधानसभा
या मतदार संघातून पुन्हा एकदा अजय चौधरी हे निवडून आले आहेत. या मतदार संघातील पाच प्रभागांपैंकी पाचही जागांवर उबाठाचे नगरसेवक निवडून आले होते. परंतु आता यातील अनिक कोळीळ यांना उमेदवारी नाकारल्याने ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहेत, तर माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्याविरोधात शाखाप्रमुखाने बंड केल्याने त्यांच्या जागेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा उबाठाचा बालेकिल्ला भेदण्याची नामी संधी भाजप आणि शिवसेनेला प्राप्त झाली आहे.
महत्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक २०२
श्रध्दा जाधव, (उबाठा) पार्थ बावकर, (भाजप), विजय इंदुलकर, (बंडखोर अपक्ष) प्रमोद जाधव,(वंचित)
प्रभाग क्रमांक २०४
अनिल कोकीळ,(भाजप) किरण तावडे, (उबाठा) अवधूत न राजाराम,( कांग्रेस) सुदेश साळगावकर (अपक्ष)
प्रभाग क्रमांक २०६
नाना आंबोले, (भाजप) सचिन पडवळ,(उबाठा) सुनील यादव,( काँग्रेस ) रामवचन मुराई ,(एनसीपी)
वरळी विधानसभा
वरळी विधानसभेत उबाठाचे नेते आणि आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या विधानसभेत सहा महापालिका प्रभाग असून त्यात उबाठाचे चार आणि शिवसेनेचे चार नगरसेवक होते. आता सहा पैकी पाच जागांवर उबाठा आणि एका जागेवर मनसे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर चार शिवसेना आणि दोन जागांवर भाजप उमेदवार आहेत. विशेष म्हणजे उबाठा आणि आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या या मतदार संघातील एकमेव १९५ वगळता पाचही प्रभागात उबाठाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उमेदवारांच्या नावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच मित्र पक्ष असलेल्या मनसेनेही नाराजी उघड बोलूनही दाखवली. या प्रभागातील १९९ चा वाद पराकोटीला पोहोचला होता आणि उबाठाच्या किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता. तर प्रभाग १९३ उबाठाने आपल्याकडे ठेवल्याने मनसेचे इच्छुक उमेदवार संतोष धुरी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
महत्त्वाच्या लढती
प्रभाग क्रमांक १९३
प्रल्हाद वरळीकर (शिवसेना),हेमांगी वरळीकर(उबाठा), सूर्यकांत कोळी(अपक्ष उबाठा बंडखोर)
प्रभाग क्रमांक १९५
समाधान सरवणकर(शिवसेना), निशिकांत शिंदे (उबाठा), अशोक गुज्जेटी (वंचित बहुजन)
प्रभाग १९६
सोनाली सावंत(भाजप), पद्मजा चेंबूरकर(उबाठा), रचना खूटे(वंचित बहुजन),मानसी दळवी(अपक्ष शिवसेना बंडखोर), संगीता जगताप (अपक्ष उबाठा बंडखोर)
प्रभाग क्रमांक१९८
वंदना गवळी(शिवसेना), अबोली खाडे (उबाठा)
प्रभाग क्रमांक १९९
रुपल राजेश कुसळे (शिवसेना), किशोरी पेडणेकर (उबाठा), नंदिनी जाधव (वंचित)






