जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असतानाच महापालिकेचा नवीन महापौर कोण होणार, याबाबतचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कारण महापौरपदासाठीचे आरक्षण अजूनही जाहीर झालेले नसून या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला की सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद राखीव होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने इच्छुकांची धडधड वाढली आहे. महापालिकेचा पुढील कारभार कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. तर १३ ला सायंकाळी पाचपर्यंत प्रचाराची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांना अवघे आठ दिवस मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळाले आहेत.