Thursday, January 8, 2026

महर्षी वाल्मिकी

महर्षी वाल्मिकी

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी anuradh.klkrn@gmil.com

राम रामेति मधुरं मधुराक्षरम् | आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मिकिकोकिलम् ||

अर्थ - काव्यरूपी फांदीवर आरूढ होऊन “राम राम’’ अशा मधुर अक्षरांचे गोड गुंजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकीळ पक्ष्याला आमचा नमस्कार असो.

देवर्षी नारदांनी महर्षी वाल्मिकींपुढे रामचरित्राचे पावन चित्र उभे केले होते. त्या चरित्राच्या संजीवनाने महर्षी वाल्मिकींना अखंड प्रसन्नता प्राप्त झाली होती. त्या प्रसन्नतेतच ते एका रम्य प्रभाती तमसा नदीकाठच्या सुंदर परिसरात विहार करीत होते. तेथे सर्वत्र हिरवीगर्द वनस्पती होती, नाना तऱ्हेचे पक्षी मुक्त संचार करीत होते. त्या शीतल वातावरणात निसर्गाच्या निर्मळ दर्शनातूनच महर्षी वाल्मिकी परमेश्वरी अनुभव घेत होते, त्यांच्या स्नेहसिग्ध व्यक्तिमत्त्वाने कोणतेही पशुपक्षी त्यांच्याजवळ निर्भयतेने वावरत.

हिरवागार शुक त्यांच्या खांद्यावर बसून गुजगोष्टी करू लागला, महर्षींनीही त्याला प्रेमाने थोपटले. तोच त्यांच्यासमोर पाच फूट उंचीची एक देखणी पक्ष्यांची जोडी अवतरली. उंच मान, उंच पाय. चेहरा व डोक्यावर शोभणारा लाल, पांढरा पट्टा, बाकी सर्व शरीर हलक्या करड्या रंगाचे अशी क्रौंच पक्ष्याचे युगुल एकमेकांभोवती नाचत फिरत होते. त्यांचा परस्परांविषयीचा अतूट प्रेमभाव अद्वैताची साक्ष देत होता.

इतक्यात एक शर सपकन तेथे आला आणि त्या क्रौंचयुगुलातला नर महर्षी वाल्मिकींसमोर विद्ध होऊन पडला. त्याला तसे पडलेले पाहून त्याची मादी अति आर्त चित्कार काढीत त्याच्याभोवती घिरट्या घालू लागली. तिचा तो विलक्षण व्याकूळ विलाप महर्षींच्या हृदयाला भिडला. त्यांच्याही नेत्रांतून अश्रू वाहू लागले. तोच ज्याच्या बाणाने क्रौंच पक्ष्याचा वेध घेतला होता, तो पारधी विद्ध झालेल्या पक्ष्याला घेऊन जायला विजयी वीराच्या अविर्भावात तेथे आला. त्याला पाहताच महर्षी वाल्मिकींच्या तोंडून शब्द बाहेर आले, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः । यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम् ।।१५।।(वा.रा.बालकाण्ड स.२) अरे पारध्या, तू या प्रणयधुंद क्रौंच पक्ष्यांतील नराला मारले आहेस, जा, तुला कधीही प्रतिष्ठा, शांती प्राप्त होणार नाही.

महर्षी वाल्मिकींचे दिव्य शब्द ऐकताच पारधी एकदम थबकला, आपला अंतर्बाह्य कायापालट होतोय, असे त्याला जाणवले, महर्षींच्या पायावर कोसळून त्याने क्षमायाचना केली, त्याला क्षमा करीत महर्षींनी शोकाकुल क्रौंचपक्षिणीलाही सावरले. त्यावेळी अवघ्या वातावरणात महर्षी वाल्मिकींचे शब्द गुंजत होते. त्यातील क्रोधाचा भाव तर गळून गेला होता पण त्या शब्दांच्या अपूर्व रचनेने आलेली नादमधुरता स्वतःवरच लोभावली होती. महर्षींचा शब्दध्वनी आपल्याला प्राप्त झालेला लय, तालाचा शृंगार पुन्हापुन्हा निरखत होता. त्या समयी आकाशात उमटलेले देवी शारदेचे अमृतमय स्मित तमसा नदीत प्रतिबिंबित झाले. त्यामुळे उचंबळलेले नदी हर्षतुषार महर्षींपर्यंत आले. त्यांना एकदम जाणवले, अरे, क्रौंचपक्षिणीचा करुण विलाप ऐकून आणि त्या विलापाला कारण असलेल्या पारध्याला पाहून आपल्या मुखातून उत्कटपणे निघालेले शब्द चार पादांमध्ये बसूनच आले, प्रत्येक पादात समान अक्षरं आहेत, या त्यांच्या सहज बांधीवतेने त्यांना स्वयंभू गेयता आली आहे. आज आपल्याकडून जी ही अपूर्व नादमय शब्दरचना घडली ती भावपूर्णतेतून, शोकातून उदयास आली म्हणून तिला श्लोक म्हणायला हवे.

महर्षी वाल्मिकींच्या स्वगतातला “श्लोक” शब्द त्यावेळी तेथे आलेल्या त्यांच्या शिष्यवराने म्हणजे महर्षी भरद्वाजाने ऐकला.

तो ऐकताच भरद्वाजांनी त्याचा अर्थ विचारला. महर्षी वाल्मिकींनी त्यांना सर्व घटना सांगितली, ती ऐकताच भरद्वाजांनी महर्षी वाल्मिकींच्या मुखातून साहित्यविश्वात सर्वात प्रथम अवतरलेला श्लोक लगेच मुखोद्गतच केला.

महर्षी भरद्वाज सामवेदी असल्याने तो अधिकच सुबकतेने त्यांच्याकडून म्हटला गेला. तेव्हा महर्षी वाल्मिकी म्हणाले, “भरद्वाजमुने, ही श्लोकरचना वीणेच्या तालावरही म्हणता येईल...’’

आपल्या आश्रमात आल्यावरही महर्षी वाल्मिकी या श्लोकरचनेचाच विचार करीत होते. त्या समयी सृष्टीकर्त्या विधात्याचे तेथे आगमन झाले. ब्रह्माच्या आगमनासह नवनिर्मितीची प्रेरणाही येत असते, हे वाल्मिकीऋषी जाणत होते. त्यांनी मोठ्या श्रद्धेने विरंचींचे यथाविधी पूजन केले. विरंची प्रसन्नतेने त्यांना म्हणाले, “आदिकवी वाल्मिकी, आपल्याला देवर्षी नारदांनी जे रामचंद्रांचे चरित्र कथन केले ना, ते चरित्र आपण शब्दबद्ध करावे आणि आता आपण जशी श्लोकरचना केली त्याच श्लोकरचनेत हे रामचरित्र गुंफावे. रामराजाच्या सत्यनिष्ठेचे, कर्तव्यपालनाचे, पराक्रमाचे आदर्श चित्र आपल्या या श्लोकरचनेतून प्रकट व्हावे. ’’

रामस्य सह सौमित्रे राक्षसानां च सर्वशः । वैदेह्याश्चैव यद् वृत्तं प्रकाशं यदि वा रहः ।।३४।। तच्चाप्यविदितं सर्वं विदितं ते भविष्यति । न ते वागनृता काव्ये काचिदत्र भविष्यति ।।३५।।(वा.रा. वा.रा.बालकाण्ड स.२)

“राम, लक्ष्मण, सीता आणि राक्षस या सर्वांशी संबंधित प्रकट अथवा गुप्त असा प्रत्येक वृतांत आपल्याला प्रत्यक्ष दिसेल, त्यामुळे आपण लिहिणार असलेल्या रामचरित्रकाव्यात असत्याचा अंशही नसेल ’’ असा वर ब्रह्मदेवांनी महर्षी वाल्मिकींना दिला.(पूर्वार्ध)

Comments
Add Comment