रत्नागिरीत थंडीची लाट; दापोलीत मिनी महाबळेश्वरमध्ये पारा फक्त ७.४°C रत्नागिरी – उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. राज्यातील हवामानातील चढ-उतारामुळे कोकणासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईत तापमानात घट झाली आहे.राज्यभर जोरदार थंडीच वातावरण पहायला मिळत आहे.. कोकणात पुन्हा एकदा थंडीचा कडाका जाणवत असून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर परिसरात तापमान फक्त ७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. या ठिकाणाला स्थानिक लोक “मिनी महाबळेश्वर” म्हणून ओळखतात.
मागील पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी काहीशी कमी जाणवत होती, पण पुन्हा एकदा पारा घसरल्याने थंडीची झळ लागली आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे विदर्भ-मराठवाड्यात गारठा जाणवत असून मुंबईतही तापमानात घट झाली आहे.
थंडीमुळे कोकणातील बागायतदारांना काहीशी दिलासा मिळाला आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी थंड हवामान फायदेशीर ठरत असून दिवसभर सूर्यप्रकाशामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता होती, पण आता वातावरण सुधारल्याने बागायतदारांचा मनाचा बोजा हलका झाला आहे.
राज्यातील किनारपट्टी भागांमध्ये पावसाळी आणि दमट हवामान अनुभवायला मिळत असले तरी, थंडीच्या लाटेमुळे गारठ्याचा अनुभव राज्यभर वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की उत्तर भारतातील थंडीची लाट काही दिवस चालू राहणार असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे.