Madhav Gadgil dies : एका 'व्रतस्थ' पर्यावरण शास्त्रज्ञाला आपण मुकलो! डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरणाची मोठी हानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली

"ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर 'जनतेचे वैज्ञानिक' होते"; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या डॉ. गाडगीळांच्या आठवणी


मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि संतुलनासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने विज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. "एका व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला आपण मुकलो आहोत," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. गाडगीळ यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.



'जनतेचा वैज्ञानिक' हरपला




मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात डॉ. गाडगीळ यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, "डॉ. गाडगीळ यांनी सहा दशकांहून अधिक काळ वैज्ञानिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांनी अनेक मोठी पदे भूषविली असली, तरी ते स्वतःला नेहमी 'जनतेचा वैज्ञानिक' मानत असत. सामान्य माणसांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे."



पश्चिम घाटाचा 'रक्षणकर्ता'


पश्चिम घाटातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी डॉ. गाडगीळ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. त्यांनी या भागातील संवेदना जिवंत ठेवण्यासाठी आणि प्रगल्भ करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने (UN) त्यांना २०२४ मध्ये ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान मिळवणारे ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते, याचा सार्थ अभिमान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



मार्गदर्शकाची उणीव भासेल


"डॉ. गाडगीळ यांच्या निधनामुळे आपण एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला मुकलो आहोत. पर्यावरण जतन आणि संवर्धन क्षेत्राला त्यांची उणीव कायम भासत राहील," असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी गाडगीळ कुटुंबीय, त्यांचे संशोधक विद्यार्थी आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी होत, ईश्वराने त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थनाही केली.



कोण आहेत डॉ. माधव गाडगीळ?


१९४२ मध्ये पश्चिम घाटाच्या कुशीत जन्मलेल्या डॉ. गाडगीळ यांना बालपणापासूनच निसर्ग आणि संस्कृतीचे आकर्षण होते. शालेय जीवनातच त्यांनी निसर्ग शास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे आणि मुंबईत झाले, त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून 'मॅथेमॅटिकल इकोलॉजी' (गणिती पर्यावरणशास्त्र) या विषयात १९६९ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. हार्वर्डमध्ये त्यांनी लेक्चरर म्हणूनही काम केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन केले आणि तिथे 'सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडीज'ची स्थापना केली. डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत आले ते त्यांनी भूषविलेल्या 'पश्चिम घाट पारिस्थितिकी तज्ज्ञ समिती'च्या (WGEEP) अध्यक्षपदामुळे. पश्चिम घाटावर पडणारा वाढत्या लोकसंख्येचा ताण आणि हवामान बदलाचा परिणाम यांचा अभ्यास करून त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या. जरी त्यांच्या शिफारसींवर वाद झाले असले, तरी आजही पर्यावरण धोरणांच्या चर्चेत त्यांचा अहवाल दिशादर्शक मानला जातो. भारताचा 'जैवविविधता कायदा' (Biological Diversity Act) तयार करण्यातही त्यांची भूमिका मोलाची होती. डॉ. गाडगीळ यांनी केवळ प्रयोगशाळेत संशोधन केले नाही, तर ते शेवटपर्यंत निसर्गाशी आणि लोकांशी जोडलेले राहिले. २०२३ मध्ये त्यांनी 'A Walk Up The Hill: Living With People and Nature' हे आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते. स्टॅनफोर्ड आणि कॅलिफोर्निया (बरकले) सारख्या जागतिक विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या या शास्त्रज्ञाला त्यांच्या कार्यासाठी २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा