Thursday, January 8, 2026

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर कराचा अणुबॉम्ब? ५००% टॅरिफ भारतावर लावणार?

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर कराचा अणुबॉम्ब? ५००% टॅरिफ भारतावर लावणार?

मुंबई: काल मोदी माझे मित्र म्हणत भारताने रशियाकडून माझ्या सांगण्यामुळे कच्चे तेल खरेदी करणे बंद केले म्हणणारे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता भारतावर ५००% टॅरिफ कर लावण्याच्या तयारीत आहेत असे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. युएसचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम (Lindsey Graham) यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून आयात करणाऱ्या भारत, चीन, ब्राझील अशा देशांवर थेट ५००% शुल्क टॅरिफ आकारण्याच्या बिलाला 'ग्रीन सिग्नल' दिल्याचे म्हटले आहे. रशियावर निर्बंध घालण्यासाठी हे बील ट्रम्प यांनी स्विकारल्याच्या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे हे शुल्क लागू झाल्यास मूळ किंमतीच्या ५००% शुल्क या देशाच्या निर्यातीवर युएस लावू शकते.

युएसकडून सांगण्यात येत असलेल्या माहितीमध्ये सातत्याने याच पैशातून रशिया युद्ध सामग्री वाढवत आहे. त्यामुळे हे टेरर फंडिग असल्याचा आरोप भारतावर केला जात आहे. त्यामुळे या भारत, चीन, ब्राझील अशा देशातील निर्यातीवर कडक बंधने टाकून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न युएसकडून दिल्लीवर सुरु झाला आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत युएसने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतले होते. नव्या युएस आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात रोजगार निर्मितीतही घट झाल्याने युएस अर्थव्यवस्थेपुढे संकट असल्याचे दिसून आले. पहिले एच१बी व्हिसावरील अतिरिक्त १ लाख डॉलर शुल्कानंतर नवे शुल्क टॅरिफ भारतावरील नवा राजकीय स्ट्राईक युएस करण्याच्या प्रयत्नात आहे दरम्यान याला नवी दिल्ली कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रस्तावित कायद्याचा उद्देश अशा राष्ट्रांना शिक्षा करणे आहे, जी अमेरिकेच्या मते, युक्रेनमधील सध्याच्या युद्धादरम्यान रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी करून 'पुतिनच्या युद्धयंत्रणेला इंधन पुरवत आहेत'. हे विधेयक अद्याप मंजूर झाले नसले तरी, ग्रॅहम यांनी संकेत दिले की त्यावर पुढील आठवड्यातच द्विपक्षीय मतदान घेतले जाऊ शकते.

ट्रम्प यांनी रशियावरील द्विपक्षीय निर्बंध विधेयकाला 'हिरवा कंदील' दाखवला बुधवारीएक्सवर एका पोस्टमध्ये लिंडसे ग्रॅहम म्हणाले 'आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर झालेल्या अत्यंत फलदायी बैठकीनंतर, त्यांनी रशियावरील द्विपक्षीय निर्बंध विधेयकाला हिरवा कंदील दाखवला आहे, ज्यावर मी सिनेटर ब्लुमेंथल आणि इतर अनेकांसोबत महिन्यांपासून काम करत आहे.' ग्रॅहम पुढे म्हणाले आहेत की, या विधेयकाची वेळ महत्त्वाची आहे, कारण युक्रेन शांततेसाठी सवलती देत आहे, तर रशिया लष्करी कारवाई सुरूच ठेवत आहे. "हे विधेयक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्या देशांना शिक्षा करण्याची परवानगी देईल, जे स्वस्त रशियन तेल खरेदी करून पुतिनच्या युद्धयंत्रणेला इंधन पुरवत आहेत'असे ग्रॅहम यांनी लिहिले. यामुळे ट्रम्प यांना भारत, चीन आणि ब्राझीलवर प्रचंड दबाव टाकण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी पुढे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment