सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली चिमुकली मुले आणि कुटुंबीयांनी म्हातारी माणसे गमावली आहेत. त्यामुळे गावांमध्ये बिबट्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशीच काहीशी घटना सांगली जिल्ह्यातील उपवळे गावात बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री घडली. घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ९ वर्षीय चिमुकलीवर झडप घालत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून तिच्या ११ वर्षांच्या भावाने धाडस दाखवत बहिणीचा जीव वाचवला. या प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मुलाच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
उपवळे गावातील हनुमान मंदिराजवळ संग्राम पाटील यांचे घर आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर शिवम आणि स्वरांजली पाटील हे भाऊ-बहीण एका घरातून दुसऱ्या घराकडे जात होते. त्याच वेळी घरांच्या मधील मोकळ्या जागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीवर हल्ला चढवत तिची मान पकडली.
क्षणाचाही विलंब न करता शिवमने प्रसंगावधान राखत बहिणीचा पाय पकडला आणि तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. बिबट्याने दोघांना काही अंतर फरफटत नेले, मात्र शिवमने बहिणीचा पाय सोडला नाही. याच दरम्यान मुलांच्या आईने जोरात आरडाओरडा केला. आवाज आणि लोकांची गर्दी वाढताच बिबट्याने अखेर मुलीला सोडून पळ काढला.
स्वेटर आणि टोपी ठरली संरक्षणाची ढाल
स्वरांजलीने स्वेटर व डोक्यावर टोपी घातलेली असल्याने बिबट्याचे दात थेट मानेत रुतले नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र तिच्या मान, हात आणि पाठीवर जखमा झाल्या आहेत. दोन्ही मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अवघ्या ११ वर्षांच्या शिवम पाटीलने दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला. जीव धोक्यात घालून बहिणीला वाचवणाऱ्या या चिमुकल्या वीराचे गावासह संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.






