मी बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक बोलतोय...

मिलिंद रघुनाथ पोतनीस


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकाच्या आठवणीतला हा आहे, शिवसेनेचा धावता इतिहास. शिवसेनेच्या; म्हणजे शिवसैनिकाच्या रक्तात काय आहे, तो कसा विचार करतो, आपल्या संघटनेच्या इतिहासातून त्याची मानसिकता कशी घडली आहे, याचं हे प्रतिबिंब... आजपासून क्रमश: प्रसिद्धकरतो आहोत -


सैनिकांनो, जय महाराष्ट्र !


१९६६ साली हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेना सुरू करण्यापूर्वी ३ वर्षआधी माझा जन्म. प्रभादेवी, मुंबईचा. आई-वडिलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यामुळे माझे सगळे शालेय शिक्षण मुंबई शहरातील एका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही शहरातून उपनगरात स्थायिक झालो. त्यामुळे मी पक्का मराठी मुंबईकर आहे.


मूळगाव तळ कोकणात. मुंबईतला तळ कोकणातला माणूस शिवसेनेच्या मागे एक दिलाने उभा राहिला. तसा मीही स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून जाऊन कट्टर शिवसैनिक बनलो. बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वंदनीय, माननीय, पूजनीय सगळं काही होते. माझ्यासाठी ‘साहेब’ एकच होते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे.


स्व. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र वाचनात आल्याने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाने मी पुरता भारावून गेलो होतो. त्यातच ८० च्या दशकांत स्व. बाळासाहेबांची दमदार भाषणे, तडफदार वक्तृत्व, रोखठोक विचार, मिश्कील टीकाटिप्पणी, मार्मिक साप्ताहिकामधील खुमासदार व्यंगचित्रे आणि मुंबईकर मराठी माणसासाठी त्यांचा तुटणारा जीव यामुळे मी शिवसेनेकडे आकृष्ट झालो. बाळासाहेबांना मराठी माणसाचे दैवत मानू लागलो आणि माझ्या दैवतामुळे मी कधी शिवसैनिक झालो, हे माझे मलाच कळले नाही. तो काळ होता १९८० चा... माझं वय जेमतेम १६/१७ वर्षांचं होतं. एवढा मी तरुण. नुकताच कॉलेजला प्रवेश घेतलेला कॉलेज विद्यार्थी. स्वर्गीय बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेला एक अस्सल मुंबईकर मराठी शिवसैनिक.


बाळासाहेब शिवसेनाप्रमुख असले, तरी त्यांची जडणघडण ही व्यंगचित्रकार आणि संपादक म्हणून झाली होती. त्याचाही परिणाम त्यांच्या भाषेवर झाला आहे. त्यांचा प्रत्येक शब्द हा व्यंगचित्रासारखाच बाहेर पडत असे. बाळासाहेब व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषेत उपमा, प्रतिमा आणि रुपके पाहायला मिळत असत. शरद पवार जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा बाळासाहेब भरसभेत त्यांना ‘साखरेचं पोतं’ संबोधून हशा आणि टाळ्या मिळवत. त्याआधी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तत्कालिन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना एका मुलाखतीत त्यांनी ‘मोरारजी डायरचाही बाप आहे’ या शब्दात त्यांच्यावर टीका केली होती. अण्णा हजारेही बाळासाहेबांच्या वाग्बाणांपासून वाचलेले नाहीत. महाराष्ट्रात शिवसेना - भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता होती, तेव्हा अण्णा काही मंत्र्यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. त्यांच्या या आंदोलनाची टिंगल करताना बाळासाहेबांनी त्यांना ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ म्हटलं होतं. महाराष्ट्राची जनता साहेबांच्या या खोचदार वक्तृत्वावर भयंकर खूश होती आणि त्यालाच आम्ही ‘ठाकरी शैली’ म्हणत असू.मग मी हळूहळू शिवसेनेचा इतिहास वाचू लागलो. जुन्या जाणत्या शिवसैनिकांकडे चौकशी करू लागलो.


स्वातंत्र्यानंतर देशाने भाषावर प्रांतरचना स्वीकारून देखील मराठी भाषिकांच्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबई महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी मुंबईच्या मराठी माणसाला जो शब्दातीत संघर्ष करावा लागला, त्यातून संयुक्त महाराष्ट्राची प्रचंड चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पोलीस गोळीबारात १०६ हुतात्मे झाले. त्या पार्श्वभूमीवर १९६० साली महाराष्ट्राचा मंगलकलश आल्यावरदेखील मुंबईत मराठी माणसावर परप्रांतीयांकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सरकारी नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना, मराठी माणसाला डावलले जाण्याच्या विरोधात अस्वस्थ मराठी मुंबईकरांच्या मनातील असंतोषाला बाळासाहेबांनी वाचा फोडली. १९ जून १९६६ रोजी शिवाजी पार्कात प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘मी माझा बाळ या महाराष्ट्राला देतोय’ असं सांगत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. ‘मराठी माणसाच्या न्याय हक्का’साठी शिवसेनेची स्थापना केली. अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या नावाने स्थापन झालेल्या ‘शिवसेने’ भोवती, त्यांच्याच भगव्या झेंड्याखाली मुंबईतील मराठी तरुण मोठ्या संख्येने एकवटला. विशेषतः माझ्या तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समस्त मराठी मुंबईकर बघता बघता शिवसैनिक झाला. बाळासाहेबांवरून जीव ओवाळून टाकू लागला. ‘साहेबां’चा शब्द त्याच्यासाठी अंतिम होता.


मुंबईच्या राजकीय सारीपाटावर बाळासाहेबांच्या शिवसेनेची एन्ट्री झाली. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण... आणि ते २०% राजकारण कशासाठी? तर मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी! बस्स... आता कोणाचीच गरज नाही. आपल्याला आपला हक्काचा नेता आणि आपला हक्काचा राजकीय पक्ष मिळाला आहे हीच बहुसंख्य मुंबईकर मराठी माणसाची भावना होती. ‘मराठी माणूस’ (विशेषतः मुंबईतला) हा शिवसेनेच्या केंद्रस्थानी होता. त्यातला मी एक होतो, याचा मला नेहमी अभिमान वाटत आला.


बघता बघता मुंबईत जवळपास प्रत्येक वॉर्डात शिवसेनेच्या शाखा उघडू लागल्या. संध्याकाळी मोठ्या संख्येने मराठी तरुण त्या शाखांमध्ये येऊ लागले. शाखेवर डौलाने फडकणारा भगवा, शाखेत ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा, शाखेच्या बाहेर रंगवलेला आणि एका अर्थाने शिवसेनेचा लोगो ठरलेला तो फिस्कारणारा वाघ नि अत्यंत वळणदार आणि सुंदर हस्ताक्षरातील रंगीबेरंगी खडूंनी लिहिलेला फळा... सगळ्या शिवसैनिकांसाठी शाखा म्हणजे आकर्षणाचा आणि अभिमानाचा विषय होता. शिवसेनेची शाखा ही गरजू नागरिकांसाठी एक आधार केंद्र बनू लागली होती. आपल्या अडीअडचणी तक्रारी घेऊन अनेक नागरिक शिवसेनेच्या शाखेत यायचे. शाखाप्रमुख आपल्या परीने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असे.


समोरच्याला गोड शब्दात समजले तर ठीक; अन्यथा कानफाट फोडून समजावण्याची शिवसैनिकांची स्टाईल होती. ‘वडापावची गाडी’ ही मराठी तरुणाला रोजगारासाठी शिवसेनेने दिलेली अलौकिक देणगी आहे. (आणि तुमची रोजगाराची गाडी वडापावच्या पुढे कधी गेलीच नाही, म्हणून वडापाव खात खात आम्हाला हिणवणाऱ्या खवट्या भाजपवाल्यांच्या बालबुद्धीची मला कीव येते!)


७०च्या दशकांत नोकरभरतीमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो, असं सांगत शिवसेनेने एअर इंडिया, ओबेरॉय शेरेटन हॉटेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फूड काॅर्पोरेशनवर मोर्चे काढायला सुरुवात केली होती. त्याकाळी या आस्थापनांचे प्रमुख अमराठी असायचे. त्यापैकीच एअर इंडियाच्या मुख्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढला होता. या मोर्चाचं नेतृत्व खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं होतं. या मोर्चात एअर इंडियाचे चीफ पर्सनेल ऑफिसर नंदा यांचं कानफाट फोडण्यात आलं होतं. साहेबांच्या पुढ्यात. ‘कोणाला अटक झाल्यास एअर इंडियाच्या बाहेर जमलेले शिवसैनिक चिडतील,’ असा इशारा साहेबांनी मोर्चाच्या वेळी दिला होता. त्यामुळे या मोर्चानंतर पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं नाही. असा होता साहेबांचा अर्थात शिवसेनेचा दरारा आणि साहेबांची स्टाईल. सर्वसामान्य मराठी मुंबईकराला शिवसेनेचा हा खाक्या भयंकर आवडला होता. यातूनच १९७४ साली साहेबांच्या पुढाकाराने सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि बँकांमध्ये मुंबईच्या ८०% स्थानिक भूमिपुत्रांची अर्थात् मराठी उमेदवारांची भरती व्हावी यासाठी संघर्ष करणाऱ्या ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची स्थापना झाली आणि पुढे या समितीने मुंबईच्या हजारो मराठी तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळवून
दिल्या. शिवसेनेचे हे योगदान न विसरता येण्यासारखे आहे.


एकमेकांना भेटल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणताना दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला जाताना हातात भगवा आणि मुखाने ‘आवाज कुणाचा... शिवसेनेचा’ ‘जय भवानी, जय शिवाजी’ गर्जना करताना या तरुण शिवसैनिकांमध्ये चैतन्याची एक विलक्षण लहर उसळायची. दसरा मेळावा हा नुसता मेळावा नसायचा, बाळासाहेबांच्या ओजस्वी विचारांचं सोनं लुटायला अक्षरशः लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर जात असत. (आम्ही एकमेकांशी बोलताना ‘जय महाराष्ट्र’ म्हणत असलो, तरी जाहीर कार्यक्रमात मात्र ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ म्हणण्याची काळजी घेत असू.) त्याच आवेशात साहेबांच्या नुसत्या एका इशाऱ्यावरून आमचा शिवसैनिक ‘हटाव लुंगी-बजाव पुंगी’ घोषणा देत बेळगावच्या खालचे सगळे मद्रासी असं समजून उडप्यांपासून शहाळी विकणाऱ्यापर्यंत सगळ्यांना सळो की पळो करून सोडत होता आणि तेव्हापासूनच ‘परप्रांतीय’ हा शब्द आमचा आवडता झाला. नागपूरच्या वर सगळे भय्ये आणि बेळगावच्या खाली सगळे मद्रासी! आमची ‘परप्रांतीयां’ची एवढी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या होती.(पश्चिम महाराष्ट्रात यादव आडनाव असते आणि विदर्भात पांडे, तिवारी ही आडनावे मराठी माणसांची आहेत; हे एका भाजपवाल्याकडून मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा चाट पडलो होतो. कारण आमच्या कोकणात असला फाजीलपणा चालत नाही. माझ्या दृष्टीने यच्चयावत सगळे यादव, पांडे, तिवारी हे परप्रांतीयच होते.)


१९६६ सालच्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेने पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्कात पहिली सभा आयोजित केली होती. कारण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बराच काळ जाहीर सभा झालेली नव्हती. कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते. शेवटी जाहीर सभा घेण्याचं ठरलं आणि ती शिवाजी पार्कवर घ्यायचं ठरलं. या सभेला काँग्रेसचे नेते रामराव आदिक उपस्थित होते. ती सभा अभूतपूर्व होती, असं त्या सभेला उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाने मला सांगितलं, तेव्हा माझा उर अभिमानाने भरून आला. तरी पण पक्षातील काही नतद्रष्टांनी साहेबांच्या लोकप्रियतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाच. बळवंत मंत्री हे शिवसेनेचे संस्थापक सदस्य होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात संघटनेत बाळासाहेबांच्या खालोखाल त्यांचीच जागा होती. मात्र साहेबांनी आपल्या वाणीने तरुणांना भुरळ घातली होती आणि त्यामुळे शिवसैनिकांसाठी साहेबांपेक्षा मोठं कुणीच नव्हतं. शिवसेनेतही साहेबांचा शब्द शेवटचा मानला जायचा. हीच गोष्ट बळवंत मंत्री यांना पटली नाही आणि त्यांनी शिवसेनेत लोकशाही हवी, अशी मागणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एक छोटेखानी सभा बोलावली होती. मात्र शिवसैनिकांनी ती सभा उधळून लावली आणि बळवंत मंत्री यांची दादरच्या वनमाळी हॉल ते शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या राहत्या घरापर्यंत धिंड काढली! बळवंत मंत्री यांचं नुसत्या धिंडीवर निभावलं, याचं मला आजही खूप दुःख होतं. पक्षातली लोकशाही वगैरे घरी ठेवायचं, आमचा पक्ष फक्त साहेबांच्या आदेशानुसारच चालणार, हीच सर्वसामान्य शिवसैनिकाची धारणा होती. त्याच्या पुढच्याच वर्षी ऑगस्ट १९६७ ला ठाणे नगरपालिकेची निवडणूक झाली. एकूण ४० जागांपैकी १५ अधिकृत आणि ६ पुरस्कृत असे शिवसेनेचे २१ उमेदवार निवडून आले. त्यामुळे शिवसेना सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेने ठाणे नगरपालिका निवडणूक लढवली आणि शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष झाला : वसंतराव मराठे. मुंबईत स्थापन झालेल्या शिवसेनेने पहिली सत्ता मिळवली ती ठाण्यात. आमच्या साहेबांचा करिश्माच तसा होता.


१९६८ साली शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. म्हणजे स्थापनेनंतर दोनच वर्षांनी. यावेळी सेनेने मधू दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने पहिल्याच फटक्यात ४२ नगरसेवक निवडून आणले होते. ‘ढाल-तलवार’ निशाणीवर! कारण आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाची कोणतीच मान्यता नव्हती. त्यामुळे सगळे उमेदवार अपक्ष आणि सगळ्यांची निशाणी ‘ढाल-तलवार’. ढाल-तलवार का? तर, आमचा पक्ष छत्रपती शिवरायांच्या नावाने स्थापन झाला होता. आणि शिवराय, मी, त्यांचे मावळे म्हणजे ढाल तलवार. आमच्या साहेबांच्या दूरदृष्टीने निवडलेल्या चिन्हामुळे आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं.
त्यावेळी शिवसेनेत फारशा महिला नसतानाही स्नेहलता कोरडे या नायगाव हिंदमाता मतदारसंघातून पहिल्या महिला शिवसेना नगरसेवक झाल्या, हे कळल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. माझा साहेबांबद्दलचा आदर दुणावला.


या निवडणुकीच्या प्रचारावेळी शिवसेनेकडून एक मिरवणूक काढण्यात आली होती. लहू आचरेकर आणि ऑर्थर डिसुझा नावाचे कार्यकर्ते या मिरवणुकीत राम-लक्ष्मण बनले होते. तेव्हा त्यांच्या हातात ताणलेला धनुष्यबाण होता. शिवसेनेची आपल्या प्रचाराची ही अनोखी स्टाईल तेव्हा गाजली होती. मुंबईतील पहिली निवडणूक असूनही शिवसेनेने मुंबईत आपली चांगलीच छाप सोडली. साहेबांच्या अनोख्या कल्पनाशक्तीला मी मनोमन त्रिवार मुजरा केला.याच दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक भाई शिंगरे यांचे बंधू बंडू शिंगरे यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप झाला आणि साहेबांनी त्यांना पक्षाच्या भर बैठकीतून बाहेर काढलं होतं. बंडू शिंगरे चांगलेच खवळले होते आणि त्यानंतर ते नेहमीच साहेबांच्या विरोधात बोलू लागले. स्वारी इथंच थांबली नाही, तर साहेबांना विरोध करण्यासाठी त्यांनी प्रतिशिवसेनेची स्थापना केली आणि स्वतःला ‘प्रतिशिवसेनाप्रमुख’ अशी उपाधीसुद्धा लावली. मात्र साहेबांसारखं वागणं त्यांना कधीच जमलं नाही (ते बापजन्मात शक्यही नव्हतं. कारण साहेब ते साहेब!) आणि काहीच दिवसांत त्यांची प्रतिशिवसेना मरगळली. शिवसेनेला खिंडार पाडण्याचा त्यांचा हा प्रयोग पुरता फसला.


९ ऑगस्ट १९६८ रोजी नरेपार्क मैदानावरील सभेत बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उपस्थित कामगार विश्वातील एका वेगळ्या तत्वज्ञानाच्या श्वासाने भरलेली पहिली मराठमोळी तुतारी फुंकली गेली आणि मुंबईच्या हिंदुस्थानाच्या कामगार चळवळीतील ‘भारतीय कामगार सेना’ नामक एका बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला. शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेना प्रमुखांची मुख्य शिकवण या विचारावर आधारीत मराठी माणसाची आपली हक्काची ही कामगार सेना होती. भारतीय कामगार सेनेचा विषय निघाला, की प्रत्येक वेळी हे बिनडोक भाजपवाले भारतीय मजदूर संघ नावाच्या कोणत्यातरी कधीच न ऐकलेल्या कामगार संघटनेच्या लाखातल्या सदस्य संख्येची टीमकी वाजवतात. (भारतीय कामगार सेना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतात साजरा केल्या जाणाऱ्या १ मे या दिवशी कामगार दिन पाळते. पण हा तर कम्युनिस्टांचा आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे म्हणून आमची टर उडवणाऱ्या फडतूस भाजपवाल्यांना तो महाराष्ट्र दिन आहे तो तुम्हाला दिसत नाही का? असा रोखठोक सवाल विचारून मी त्यांची थोबाडे बंद करतो.)


साल होतं १९६९. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून आंदोलन पेटलं होतं. तेव्हाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. माहिमच्या नाक्यावर त्यांची गाडी थांबवली जाण्याची शक्यता होती. सीमावासीयांकडून त्यांना एक निवेदन दिले जाणार होते. त्यानंतर ते तिथून निघून जाणार होते. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं. मोरारजी देसाई आले आणि बेगुमानपणाने त्यांची गाडी निघून गेली. त्यांच्या ताफ्यातील पायलट कारने तेथे उपस्थित असलेल्या लोकांना उडवलं आणि त्या निघून गेल्या. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले. काहीजणांच्या अंगावर गाडीची चाकं गेली आणि अचानक दगडफेक सुरू झाली. अश्रुधुराचा मारा सुरू झाला आणि त्याच रात्री शिवसेनाप्रमुखांना अटक झाली.पुढचे सलग ३ महिने साहेब आणि शिवसेनेचे आणखी काही नेते पुण्यातील येरवडा तुरुंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली. अनेक महिने मुंबई जळत होती. अनेक प्रयत्न केले गेले. मुंबईत आर्मी आणण्याचे प्रयत्न केले; पण तुरुंगातून शिवसेनाप्रमुखांनी आवाहन केल्यानंतर एका क्षणात मुंबई शांत झाली. महाराष्ट्रावर इतके निस्सीम प्रेम करणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी शिवसैनिक असल्याच्या भावनेने माझी छाती अभिमानाने फुलून गेली.


महाराष्ट्राची विधानसभा अजून शिवसेनेसाठी दूरच होती. मात्र आई भवानीच्या कृपेने तीही संधी चालून आली. ५ जून १९७० च्या मध्यरात्री लालबाग परळचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात कॉम्रेड कृष्णा देसाई यांचं निधन झालं. पोटनिवडणूक जाहीर झाली. कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या विधवा पत्नी श्रीमती सरोजिनी देसाई यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेससह १३ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. शिवसेनेने वामनराव महाडिक या आपल्या बिनीच्या शिवसैनिकाला पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. साहेबांनी संपूर्ण मुंबईतील शिवसैनिकांना प्रचारासाठी परळ, लालबाग मतदार संघात उतरवलेलं होतं... संपूर्ण परळ लालबाग अक्षरशः भगव्या रंगाने न्हाऊन निघालं होतं.


भारतीय जनसंघ नावाच्या एकमेव राजकीय पक्षाने शिवसेनेच्या वामनराव महाडिक यांना पाठिंबा दिला आणि हो... अगदी नगण्य असलेल्या हिंदू महासभेने सुद्धा... यात त्यांच्या शिवसेने विषयी असलेल्या प्रेमापेक्षा देशद्रोही कम्युनिस्टांच्या द्वेषाचा भाग जास्त असावा! या पोटनिवडणुकीत ‘उगवता सूर्य’ ही निशाणी घेऊन वामनराव महाडिक यांना निसटता विजय मिळाला, पण त्याचबरोबर शिवसेनेला आपला पहिला आमदार मिळाला, हे ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले... (आज मागे वळून पाहिलं असता... त्याच ‘पणती’ निशाणी असलेल्या भारतीय जनसंघाचं भारतीय जनता पक्षात रूपांतर झालं. म्हणजे ही कमळाबाईची गोचिड आम्हाला ७० सालीच येऊन चिकटली होती तर...(याच भारतीय जनसंघाचे मुकुंद आगास्कर नावाचे उमेदवार कल्याणहून तीन-चार वेळा पडले होते आणि परत निवडणुकीला उभे राहिले होते. तेव्हा शेवटी, शिवसैनिकांनी भिंतीवर... मुकुंदा, मुकुंदा पडणार तरी कितींदा एकदा, दोनदा, तीनदा, पडणं हाच तुझा धंदा... अशी चारोळी रंगवली होती. (हा किस्सा मला एका जुन्या शिवसैनिकाने सांगितला तेव्हा काही केल्या मला हसू आवरेना.)


माझ्या एकंदर माहितीप्रमाणे कम्युनिस्ट पक्ष हा एक नंबरचा देशद्रोही पक्ष. मुंबईच्या गिरणगावात या पक्षाने चांगली पकड बसवली होती. त्यामुळे, कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचं मला फारसे वाईट वाटलं नाही. कारण, कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर मुंबईतील कम्युनिस्ट पक्ष पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पण या खटल्यात १४ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झालेले विश्वनाथ (बाळा) खटाटे, भाई हाटे आणि अशोक कुलकर्णी हे तीनही आरोपी शिवसैनिक होते हे ऐकून माझी छाती अभिमानाने फुलून आली. केरळमध्ये जिंकल्यानंतर हुरळून गेलेले कम्युनिस्ट ‘परळचा केरळ’ करायला निघाले होते. पण आमच्या साहेबांनी त्यांना आव्हान दिलं... ‘परळ भगवा करून दाखवतो’ म्हणून. आणि शेवटी साहेबांनी परळ भगवा करून दाखवलाच. याचा मला आजही अभिमान आहे


कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या खुनात आमच्या साहेबांचे पण नाव आले होते. पण, त्यांच्या केसालादेखील धक्का लागला नाही. कारण, त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा वरदहस्त साहेबांच्या डोक्यावर होता म्हणे... (हा इतिहास कळला तेव्हा मला शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हणून विरोधक का हिणवतात याचे गुपित उलगडले). साहेबांनी कृष्णा देसाई यांच्या खुनात आपला आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असे बऱ्याच वेळा जाहीरपणे सांगितले. तरीच चांगल्या वर्तणुकीमुळे शिक्षा कमी होऊन लवकर सुटलेल्या या तीनही आरोपींनी तुरुंगातून बाहेर आल्याबरोबर शिवसेना सोडली. शिवसेना सोडली, तरी मला त्यांचा राग आला नाही. कारण ते शिवसैनिक नव्हते. साहेबांचा खरा शिवसैनिक जीव गेला, तरी शिवसेना सोडणारा नव्हता. हे कसले शिवसैनिक? असेच माझ्या मनाने घेतले. आणि मग १९७१ साली मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाली. दादरहून अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आलेले बाळासाहेबांचे फॅमिली डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांना साहेबांनी मुंबईचे महापौर म्हणून निवडून आणले. शिवसेनेला आपला पहिला पुरस्कृत महापौर मिळाला होता...


मात्र पुढे १९७७ मध्ये महापौरपदासाठीच सोहनसिंग कोहली या समाजवादी कार्यकर्त्यास पाठिंबा देण्याचा शब्द बाळासाहेबांनी अचानक फिरवला असा दावा डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी केला. त्यावेळी काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्या पाठीशी शिवसेना उभी करण्याचा निर्णय साहेबांनी घेतला होता. त्याच क्षणी डॉ. गुप्ते यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. पुढे याच डॉक्टर गुप्ते यांनी जनता पक्षाच्या तिकिटावर विधानसभेला मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. ज्या डॉक्टर गुप्ते यांना साहेबांनी अर्थात शिवसेनेने मुंबईसारख्या महानगरीचे महापौर केले त्यांनी साहेबांची साथ सोडावी, हे मला खूप खटकले. पण हा माणूस अपक्ष म्हणून निवडून आला होता. तो शिवसैनिक नव्हताच. मग जाईना का, अशीच माझी
धारणा झाली.


शिवसेनेत साहेबांनी जात पात कधीच मानली नाही. साहेबांना प्राणप्रिय होता तो मराठी माणूस आणि त्यांचा शिवसैनिक. त्यामुळे डॉक्टर गुप्ते हे साहेबांच्याच जातीचे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) असल्यामुळे साहेबांनी त्यांना महापौर केले, असल्या वाह्यात आरोपांकडे मी ढुंकुनही पाहिलं नाही. डॉक्टर गुप्ते मराठी होते. बस्स... त्यांना महापौर करण्यासाठी हा एकच धागा पुरेसा होता. पण साहेबांची निवड थोडीशी चुकली, असं मला राहून राहून वाटू लागलं पण, बाहेरून चांगला दिसणारा नारळ पोटातून कुचका निघणारच नाही, याची खात्री कोण देऊ शकेल?


१० ऑगस्ट १९७१ रोजी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थी सेनेचे उद्घाटन पार पडले. या वेळी साहेबांनी विद्यार्थांनी राजकारणापासून दूर राहावे, असे म्हणणाऱ्यांचा खूप समाचार घेतला. विद्यार्थांनी राजकारणात फार तर प्रत्यक्ष भाग घेऊ नये; पण त्याचं निरीक्षण आणि अभ्यास जरूर केला पाहिजे. ज्यांना उद्या या राष्ट्राची धुरा सांभाळायची आहे, त्यांनी राजकारणाबद्दल अज्ञानी राहून चालणार नाही, असे सडेतोड विचार साहेबांनी मांडले. १९७२ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये प्रमोद नवलकर गिरगाव मतदार संघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. हा इतिहास समजल्यावर पांढरपेशा समाजात शिवसेनेला मिळालेली मान्यता मला सुखावून गेली. पुढे याच प्रमोद नवलकरांनी १९८६ ते २००६ अशी तब्बल २० वर्षे मुंबईच्या पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जाऊन शिवसेना हा सुशिक्षित तसेच विद्याविभूषित जनमानसाचा देखील पक्ष असल्याचे सबंध महाराष्ट्राला दाखवून दिले. कारण तोपर्यंत शिवसेना म्हणजे गुडघ्यात मेंदू असलेल्या आक्रमक तरुणांचा पक्ष (मुंबईच्या भाषेत मवाल्यांचा) असा बऱ्याच जणांचा (गैर)समज झाला होता.


१९७३ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन (गवई गट) पक्षाशी युती करून शिवसेनेने बाजी मारली होती. यावेळी शिवसेनेला आपला स्वतःचा महापौर मिळाला. सुधीरभाऊ जोशी मात्र सुधीरभाऊ निवडून येण्यासाठी जी काही थोडी मते कमी पडत होती. ती साहेबांनी ‘मुस्लीम लीग’च्या नगरसेवकांची मिळवली, हे ऐकून माझं मन थोडं खट्टू झालं होतं. पण प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. साहेबांवर माझं नितांत प्रेम होतं आणि महापौरपदाची निवडणूक हे युद्धच होतं. त्यामुळे, अर्थात साहेबांना माफ करणारा मी कोण? अशाप्रकारे मी आपल्या मनाला समजावले.


परमेश्वरी कृपेने आमच्या भगव्याची ‘मुस्लीम लीग’शी झालेली युती इथेच संपली. आणि मग १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला साहेबांनी समर्थन दिलं. साहेब इंदिरा बाईला घाबरले असं विरोधक आम्हाला चिडवायचे. पण त्यात काहीही अर्थ नव्हता. आणीबाणी हे खरोखर ‘अनुशासन पर्व’ होते. तो काळच असा होता, की देशाला आणीबाणीची आवश्यकता होती. म्हणून आपण आणीबाणीला पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींचे ‘दमदार नेता’ म्हणून साहेबांनी कौतुकही केलं होतं. साहेबांची कालानुरूप घेतलेली ही भूमिका योग्यच होती.


कारण, त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची लाट आली. त्यांची सत्ता आली, तरी साहेबांनी काँग्रेसला असलेला आपला पाठिंबा कायम ठेवला होता. अगदी १९७७ साली शिवसेनेने काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता. त्या काळात बॅरिस्टर रजनी पटेल हे काँग्रेसचे नेते होते आणि समाजवाद्यांचे नेते होते शांती पटेल. शिवसैनिकांनी भिंतीवर घोषणा रंगवल्या होत्या, काँग्रेसचा रजनी पटेल समाजवाद्यांचा शांती पटेल, मराठी माणसाला कसं बरं पटेल?


ही घोषणा वाचून मुंबईचा मराठी माणूस मनातल्या मनात खूप आनंदी होत असे. शिवसैनिकांच्या कल्पकतेला तोड नव्हती.


अगदी याच काळात. १९ जून १९७७ रोजी शिवाजी पार्कला शिवसैनिकांच्या हक्काचे ‘शिवसेना भवन’ बांधून पूर्ण झाले. पक्षाच्या स्थापनेनंतर अकरा वर्षांनी पै पै गोळा करून हे टोलेजंग सेनाभवन बांधण्यात आलं होतं. १९७८ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून ‘रेल्वे इंजिन’ हे चिन्ह देण्यात आलं होतं. साहेबांच्या कल्पकतेप्रमाणे प्रचाराची सुरुवात रेल्वे इंजिनची पूजा करून करण्यात आली. मुंबईतील कोकणी माणसाचं वर्चस्व पाहता प्रचारात ‘कोकण रेल्वेला शिवसेनेच्या इंजिनची साद’ घालण्यात आली होती. पण, तेव्हा जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेचं रेल्वे इंजिन धावू शकलं नाही. मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ करण्याची मागणी दलित संघटनांकडून सुरू झाली होती. हे आंदोलन १६ वर्षे चाललं आणि या काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार आणि दंगली झाल्या. त्यात अनेक दलितांचे बळी गेले. १९७८ च्या सुमारास शिवसेना प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यापुरती मर्यादित होती. तिचं मराठवाड्यात संघटन नव्हतं. त्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नामांतराला उघडपणे विरोध केला होता. काही अहवालानुसार, दलित वस्त्या जाळण्यात आल्या आणि दलितांवर हल्ले करण्यात आले होते. त्यात शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील कथितरित्या सामील होते. हा इतिहास कळल्यावर मी मनातल्या मनात थोडा खट्टू झालो होतो. मराठवाडा हा आपला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसुद्धा आपलेच आहेत, अशी भूमिका साहेबांनी घ्यायला हवी होती, असे माझ्या मनाला चाटून गेलं. पुढे २०११ मध्ये साहेबांनी आपण नामांतराला कधीच विरोध केला नसल्याचा दावा केला. केवळ ‘मराठवाडा’ हे नाव कायम राहावं, अशी आपली इच्छा होती असें म्हटलं, तेव्हा मी समाधानाचा खूप मोठा सुस्कारा सोडला होता.


...आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून इथला पुढचा सारा इतिहास मला आजही लख्ख आठवतो आहे. पुढे १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आल्या आणि पंतप्रधान झाल्या. तेव्हा साहेबांचा निर्णय किती अचूक होता याची साक्ष जगाला पटली. लागोलाग १९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुका देखील शिवसेनेने ‘रेल्वे इंजिन’ ही निशाणी घेऊन लढवल्या. पण आमच्या पदरी घोर निराशा पडली. शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. काँग्रेसचे नेते बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना श्रीवर्धन (रायगड) मतदारसंघात शिवसेनेने पाठिंबा दिला होता. साहेब मराठी माणसाची जातपातच काय, पण धर्मदेखील मानत नाहीत. ‘मराठी मुसलमान’ देखील आपलाच मानतात, हे कळल्यावर तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मुख्यमंत्री झाल्यावर याच बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंनी आमच्या साहेबांबरोबरच्या मैत्रीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. भवानी तलवार भारतात आली नाही; पण मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना साहेबांना ब्रिटनची वारी घडली आणि ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणीही सुरू झाली. हा चमत्कार फक्त आमचे साहेबच मैत्रीच्या बळावर करू शकत होते.


१९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि देशात काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट आली. सगळे विरोधी पक्ष जमीनदोस्त झाले. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले, पण आमचे साहेब मात्र ताठ कण्याने उभे होते. आता साहेबांनी आपल्या सेनेत अनेक आमूलाग्र बदल केले. यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे, भाजपशी युती आणि हिंदुत्वाची ओढलेली शाल. फक्त मराठीच्या मुद्द्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येणार नाही हे ओळखून सेनेने ‘कट्टर हिंदुत्व’ ही आपली ओळख निर्माण केली. आपण मराठी बरोबरच ‘हिंदू’ देखील आहोत ही जाणीव करून देणाऱ्या साहेबांचा मला विलक्षण अभिमान वाटला.


आमच्याकडे स्वतःचे निवडणूक चिन्ह नसल्यामुळे साहेबांनी भाजपच्या कमळ चिन्हावर शिवसेनेचे दोन वाघ लोकसभेसाठी उभे केले. मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक. अर्थात काँग्रेसच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीच्या लाटेत दोघेही पडले. (पण यानिमित्ताने मला १९७० साली भारतीय जनसंघाने परळ-लालबाग पोटनिवडणुकीत शिवसेनेला दिलेला पाठिंबा आठवला. युतीची सुरुवात तेव्हाच झाली होती आणि ती भारतीय जनसंघाने केली होती.) यानंतर १९८५ च्या सुरुवातीलाच मार्च महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. म्हणजे महापालिकेतही काँग्रेसचीच सत्ता यायला हवी होती. पण, मुख्यमंत्री वसंतदादा पाटील सहज; की जाणून-बुजून बोलले माहीत नाही, पण ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जातो आहे पण मी ते होऊ देणार नाही’ असं एकच वाक्य बोलून गेले आणि आमच्या साहेबांनी ‘मराठी माणसा जागा हो’ची हाक दिली. त्यातच साहेबांनी अफलातून डाव टाकत सगळ्या शाखाप्रमुखांना महापालिकेची उमेदवारी दिली. मुंबईकर मराठी मतदार एकदिलाने शिवसेनेच्या मागे उभा राहिला. आम्ही ‘मशाल’ चिन्हावर लढवलेल्या १४० पैकी ७४ जागा जिंकल्या. १७० सदस्यीय महापालिकेत बहुमतासाठी त्यांना फक्त १२ जागा कमी पडल्या. परंतु तरीही आम्ही सत्ता स्थापन केली. छगन भुजबळ मुंबईचे महापौर झाले! त्यावेळी जमशेद जी. कांगा नावाचे महापालिका आयुक्त होते. “कांगांनी जर ऐकलं नाही, तर शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढावा” असं बाळासाहेब महापालिकेच्या विजयानंतर झालेल्या सभेत जाहीरपणे ठणकावून बोलले होते. याला म्हणतात ‘ठाकरे शैली’. सर्वसामान्य मुंबईकर मराठी माणसाला भावणारी.


वसंतदादा पाटील यांच्या एका वाक्याने मुंबई महापालिका शिवसेनेच्या पदरात पडली. पण, यामुळे पुन्हा एकदा आमचे कावेबाज विरोधक शिवसेनेला ‘वसंत सेना’ म्हणून हिणवू लागले. पण, मी कधीच त्यांना भीक घातली नाही. (क्रमश:)

Comments
Add Comment

मराठवाड्यातील मातब्बर गाजवताहेत प्रचाराचे आखाडे

डॉ. अभयकुमार दांडगे महानगरपालिका निवडणुकीत प्रचार पद्धतीत बदल दिसतोय. फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम रील्स,

पश्चिमघाटाचा संरक्षक

मिलिंद बेंडाळे परदेशातील उच्च पदाच्या नोकऱ्या सोडून आपल्या ज्ञानाचा वापर देशासाठी करणाऱ्यांमध्ये माधव

मी बाळासाहेबांचा मुंबईकर शिवसैनिक बोलतोय... भाग २

मिलिंद रघुनाथ पोतनीस शिवसेनेचं हिंदुत्व बावनकशी सोन्यासारखं झळाळून निघालं. आमचे साहेब अनभिषिक्त

उत्तर महाराष्ट्रात भाजप–शिवसेनेतच रंगणार तुल्यबळ लढत

धनंजय बोडके महापालिका निवडणुकीत माघारीनंतर सर्वच प्रभागांतील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. स्वबळावर

नववर्षी जगाच्या नकाशावर भारत कुठे?

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत

मध्य महाराष्ट्रातल्या रोमांचक लढतींनी वाढणार निवडणुकीत रंगत

पुणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक केवळ सत्तास्थापनेसाठीचीच नाही, तर अनेक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.