Thursday, January 8, 2026

गिरवीचे गोपालकृष्ण मंदिर म्हणजे दक्षिणेतील वृंदावन

गिरवीचे गोपालकृष्ण मंदिर म्हणजे दक्षिणेतील वृंदावन

सातारा : फलटणपासून १२ किमी. वर गिरवी नावाचं गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला गोपालकृष्ण मंदिर अर्थात भगवान गोपाळ श्री कृष्णाचं मंदिर आहे. हे मंदिर देशपांडे कुटुंबाच्या मालकीचं आहे. मंदिर व्यवस्थापन देशपांडे कुटुंबच करते. विजापूरच्या आदिलशहाच्या काळात बाबूराव गोपाळ देशपांडे उर्फ बाबूराव महाराज यांनी हे मंदिर बांधले. प्राचीन दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या आवारात नेहमीच हवा खेळती राहते. कालौघात या मंदिरात अनेक बदल झाले. पुढे या मंदिराला सभामंडप जोडण्यात आला आहे.

बाबूराव गोपाळ देशपांडे उर्फ बाबूराव महाराज हे भगवान गोपाळकृष्णांचे भक्त होते. ते दररोज भक्तिभवाने गोपाळकृष्णाची पूजा करायचे. आपल्या गावात भगवान गोपाळकृष्णाची शाळीग्रामरुपी मूर्ती घडवून मंदिर स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. अनेक दिवस त्यांना मनासारखी शिळा मिळत नव्हती. अखेर एक दिवस खोदकामादरम्यान मनासारखी शिळा मिळाली. या शिळेतून मूर्ती घडवावी असे बाबूराव महाराजांना वाटू लागले. पण ही मूर्ती घडवायची कोणी असा प्रश्न निर्माण झाला. साधारण त्याच काळात दोन मूर्तिकार गिरवी गावात बाबूरावांना शोधत आले. त्यांनी बाबूरावांना आवडेल अशी मूर्ती घडवण्याची तयारी दाखवली. पण बाबूरावांना एक प्रश्न सतावत होता तो हा की हे काम मूर्तिकार करणार कसे ? कारण दोघांपैकी एका मूर्तीकाराला हात नव्हते आणि दुसऱ्याला डोळे नव्हते. पण दोघांनी काळजी करू नका आम्ही तुम्हाला आवडेल अशीच मूर्ती घडवू असे सांगितले. एकाची दृष्टी आणि दुसऱ्याचे हात असा उत्तम समन्वय राखून मूर्ती घडवली जाईल, असे आश्वासन मिळाल्यावर बाबूरावांनी त्यांना काम दिले. आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीचा तपशील मर्तिकारांना सांगितला. मूर्तिकार कामाला लागले. अखेर डोळयांना दिपवून टाकेल अशी मूर्ती तयार झाली.

भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवत उभे आहेत. दोन गायी कान देऊन आणि तल्लीन होऊन त्यांचं बासरी वादन ऐकत आहेत, असे रूप मूर्तिकारांनी साकार केले. ही मूर्ती आवडली म्हणून बाबूरावांनी विशेष सोहळा करुन एक मंदिर स्थापन केले आणि मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिराच्या बाजूच्या भागात गणपती , हनुमानआणि नरसिंहाची मूर्ती यांचीही प्राणप्रतिष्ठा झाली. मंदिराच्या समोरील भागात हरी हर ऐक्य साधणारी गरुड, हनुमान, शंकर आणि नंदीची मूर्ती यांची प्राणप्रतिष्ठा झाली. या मंदिरात देवदर्शनासाठी आजही भाविक लांबून येतात.

Comments
Add Comment