Thursday, January 8, 2026

अंधारातून प्रकाशाकडे

अंधारातून प्रकाशाकडे

सद्गुरू वामनराव पै, जीवन संगीत । भाग ५

सध्या समाजामध्ये अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. "आपल्या हातात काही नाही, सगळे नियतीच्या हातात आहे", हा त्यातलाच एक. असे बोलणाऱ्यांची, किंबहुना हेच सत्य आहे अशी खात्री बाळगून जीवन जगणाऱ्यांची संख्या आज आपल्या समाजात खूप मोठी आहे. असे बोलले जाते तेव्हा याचा अर्थ हाच की त्या सर्व लोकांचा असा समज झालेला आहे की भाग्यविधाता कोणीतरी आहे, नियती कोणीतरी आहे. ती कुठेतरी दूर आहे. आपल्या कक्षेच्या बाहेर आहे. ती अदृश्य शक्ती आपल्या जीवनाची सूत्रे खेळते, हलवते, नांदवते आणि यामुळेच असा गैरसमज होतो आहे की प्रत्यक्षात मनुष्याच्या हाती काहीच नाही. मात्र सर्व जे काही आहे ते उपरवाल्याच्या हातात. सर्व काही आहे ते नशिबाच्या हातात. आणि मुळात नशीब फुटके. किती प्रयत्न केले तरी फुकट ! आणि यावर अशा लोकांना "तुम्ही प्रयत्न केले ते काय केले?" असे विचारले तर त्याने केलेले सर्व प्रयत्न चुकीचे असतात. "देवाचे एवढे केले, प्रयत्न एवढे केले, शेवटी आमच्या वाटेला नैराश्य आले, आपत्ती आली.", असे म्हणतात . मात्र सत्य हे आहे की तुम्ही नशीब फुटके, नशीब फुटके म्हणता म्हणूनच तुमचे नशीब तसे. कारण तुमचे बोलणे Negative, नकारार्थी. कारण शंकर म्हणतो तथास्तु ! हे तथास्तु कोण म्हणतो? उपरवाला नाही तर अंदरवाला म्हणतो.

"ईश्वरस्य सर्वभूतनां हृदयशेर्जुन तिष्ठति " हा भगवद्गीतेने लावलेला सर्वात मोठा शोध आहे. एवढा मोठा शोध जगांत आतापर्यंत कुणी लावलेला नाही. आज केवळ हिंदू म्हणतात, भगवद्गीता आमची आहे. मात्र ही सर्वांची आहे. म्हणजेच भगवद्गीता ही सर्व धर्मियांसाठी तितकीच उपयुक्त व आवश्यक आहे. संत हे सर्व धर्माचे असतात. त्यांनी कुठेही हा माझ्या धर्माचा, तो त्या धर्माचा असे केलेले नाही. त्यांच्या कडे भेदाभेद नव्हता. भेदाभेद केला तो त्यांच्या अनुयायांनी केला. भगवंत किंवा संत हे अमक्या जातीचे किंवा अमक्या धर्माचे नसतात. अमुक जातीत जन्माला आला म्हणून तो त्या जातीचा, अमुक धर्मात जन्माला आला म्हणून तो त्या धर्माचा या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. माणूस जन्माला येतो तेव्हा तो कुठल्याही जातीचा, धर्माचा नसतो. जन्माला येतो तेव्हा काहीच नसते. मग त्यावर स्टॅम्प मारले जातात. पोस्टात स्टॅम्प मारला जातो तो स्टॅम्प दुसऱ्याने वापरू नये म्हणून दुसरा स्टॅम्प मारतात. जन्माला आलेल्या मुलावर एक छापा मारतो तो अमुक धर्माचा. दुसरा छापा मारतो तो अमुक जातीचा. तिसरा छापा पंथाचा, चौथा छापा कुळाचा, गोत्राचा. असे वारंवार भरपूर स्टॅम्प्स मारल्यावर काय होईल ? मुळात जो आहे तो पत्ताच दिसणार नाही व ते पाकीट कचऱ्याच्या पेटीत टाकले जाईल. हे असेच होऊन तसे स्टॅम्प्स माणसावर सतत मारले गेल्यामुळे मानवजात कचऱ्याच्या पेटीकडे सरकत आहे. कचऱ्याच्या पेटीत सगळी घाण असते तशी जगांत सर्व घाण झाली आहे. त्यातून दुजाभाव निर्माण झाला, द्वेषमत्सर निर्माण झाले, त्यातून दंगेधोपे, युद्धलढाया हे स्टॅम्प मारल्यामुळे झाले. हे स्टॅम्प जर मारले नाही तर सर्व जग सुखी होईल. सर्वांवर एकच स्टॅम्प मारायचा, तो म्हणजे "माणूस". बाकी काही नाही. हे करायला सर्वांनी सुरुवात केली की सर्व मानवजात सुखी होते की नाही ते पहा.

Comments
Add Comment