ऋतुजा केळकर, ऋतुराज
“वेलीवरती फुलांऐवजी... फुलतील फुलपाखरे... निळे जांभळे पिवळे दिसतील... रंग किती गोजिरे... भरभर खुडूनी फुलपाखरे... गजरा मी गुंफिन... निळी जांभळी पिवळी शोभा... वेणीत मी माळीन ...”
ता शेळके यांच्या या बालगीताच्या ओळींनी जणू कल्पनाशक्तीच्या आकाशात सुगंधी इंद्रधनुष्यच उमटते. फुलं आणि फुलपाखरं एकरूप होऊन रंगांची उधळण करतात आणि त्या उधळणीतून उमलतो गजरा. निरागसतेचा हार, आनंदाचा सुगंध. गजरा म्हणजे केवळ फुलांचा गुंफलेला अलंकार नाही, तर तो बालपणाच्या स्वप्नांचा, प्रेमाच्या कुजबुजांचा आणि भक्तीच्या शरणागतीचा सुगंधी धागा आहे. जाई-मोगऱ्याच्या पाकळ्या जणू मनाच्या खिडकीतून येणारा शीतल वारा, तर फुलपाखरांची रंगीत उधळण जणू जीवनाच्या क्षणभंगुरतेला दिलेला सौंदर्याचा शाश्वत स्पर्श.
देवाच्या पूजेत सर्वात महत्त्व असते ते फुलांचे. या फुलांचा गजरा म्हणजे फुलांचा हार, पण तो केवळ सजावटीचा अलंकार नाही. तो मनाच्या तारा छेडणारी सुगंधाची वीणा आहे. देवाच्या चरणी अर्पण झालेला गजरा जणू भक्तीच्या ओंजळीतील चंद्रकिरणच. फुलं क्षणभंगुर असतात, पण त्यांचा सुगंध मनात दीर्घकाळ टिकतो जसा एखादा गोड आठवणींचा ठसा, पुन्हा पुन्हा उमलणारा.
पूजेत गजरा अर्पण करणे म्हणजे निसर्गाची देणगी देवाला अर्पण करणे. जाई-मोगऱ्याच्या पाकळ्या जणू मनातील नकारात्मक विचारांना दूर करणारे शांततेचे पांढरे पंख. सुगंध हा केवळ वास नसतो, तो मनशांतीचा अदृश्य प्रवाह असतो, जो थकलेल्या मनाला स्पर्शून जातो आणि आत्म्याला प्रसन्न करतो.
गजऱ्याचा सुगंध म्हणजे अरोमा थेरपी. पण भक्तीच्या भाषेत तो म्हणजे आत्म्याला दिलेला शांतीचा स्नान. जसा पावसाचा पहिला थेंब जमिनीला तृप्त करतो, तसा गजऱ्याचा सुगंध मनाला तृप्त करतो.
फुलं-पानं अर्पण करणे म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे. गजरा हा त्या एकरूपतेचा सजीव पुरावा आहे. फुलं उमलतात, सुगंध देतात आणि क्षणात कोमेजतात जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतात. भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग आणि गजरा अर्पण करणे म्हणजे त्या त्यागाची सुंदर अभिव्यक्ती.
गजऱ्याचा सुगंध हा केवळ देवाला अर्पण केलेला नाही, तर तो भक्ताच्या मनालाही शुद्ध करतो. जसा दीप अंधार दूर करतो, तसा गजरा मनातील काळोख दूर करतो. जसा धूप वातावरण शुद्ध करतो, तसा गजरा मनाच्या खिडकीतून येणारा वारा ठरतो. गजऱ्याचा हार म्हणजे आठवणींचा हार. आईच्या केसांमध्ये गुंफलेला मोगऱ्याचा गजरा, लग्नाच्या वेळी वधूच्या वेणीतील गजरा, उत्सवात देवीच्या मूर्तीवर सजलेला गजरा प्रत्येक ठिकाणी तो आनंद, भक्ती आणि सौंदर्याचा सुगंध पसरवतो. गजरा म्हणजे सुगंधाचा दीप, भक्तीचा हार आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेची आठवण. तो केवळ पूजेतील साहित्य नाही, तर मनाला पुन्हा पुन्हा वाचावा वाटणारा अनुभव आहे.
मला ‘फुले’ आणि ‘गजरा’ यांचा जो अर्थ आजवर प्रतीत होतो तो मी सांगते, पाहा पटतोय का ते. देवपूजेसाठी अर्पण होणारी फुले म्हणजे केवळ सुगंधी पाकळ्या नव्हेत, तर ती जीवनाचा फुलोरा आहेत. ती आहे नवीन सुरुवातीचे, आनंदाचे प्रतीक. त्या फुलांच्या गुंफणीतून उमलतो गजरा, जो भगवंताच्या चरणी वाहताना भक्तीची ओंजळ बनतो. त्यातील पहिला ‘ग’म्हणजे फुलांची ही गुंफण म्हणजे नात्यांची, भावनांची आणि श्रद्धेची एकत्रित वीण.
ज्यात दुसऱ्या ‘ज’ म्हणजे विश्वाच्या अथांगतेतून उमललेले जग जणू जीवनाचा आरंभ सांगते ‘ज’ म्हणजे जागृती ही चेतनेची उन्नती घडवते. गजऱ्यातील प्रत्येक पाकळी जणू त्या जागृतीचा सुगंध आहे. म्हणूनच शेवटचा ‘रा’ म्हणजे भक्तीच्या सुरांतून उमटणारा राग, प्रेमाची मूर्ती असलेली राधा आणि भावनांची लय व्यक्त करणारी रागिनी हे सर्व गजऱ्याच्या सुगंधी धाग्यात गुंफलेले आहे.
म्हणूनच गजरा म्हणजे ललित सौंदर्याची रम्य रचना, जिथे सुगंध हा भक्तीचा स्वर होतो, रंग हा श्रद्धेचा तेज बनतो आणि गुंफण ही शरणागतीची ओंजळ ठरते.
गजरा म्हणजे सुगंधाचा दीप, भक्तीचा हार आणि जीवनाच्या क्षणभंगुरतेची आठवण. पण तो इतक्यावर थांबत नाही कारण फुलं जशी उमलतात, सुगंध देतात आणि क्षणात कोमेजतात, तसंच मानवी जीवनही आहे. जन्म हा उमलण्याचा क्षण, तर मृत्यू हा कोमेजण्याचा कटू सत्य आहे . गजऱ्याच्या पाकळ्या जशा हातातून निसटतात, तशाच प्रियजनांच्या आठवणीही काळाच्या ओघात विरतात पण सुगंध मात्र टिकतो जसा आठवणींचा ठसा मनात रेंगाळतो. मृत्यू अपरिहार्य आहे, पण त्यातूनच जीवनाची किंमत समजते. गजरा आपल्याला शिकवतो की क्षणभंगुरतेतच शाश्वततेचा शोध आहे आणि नाशातूनच नव्या आरंभाची बीजं उमलतात. तो मनाच्या गाभाऱ्यात उमलणारा लालित्याचा श्वास आहे. प्रत्येक पाकळी जणू जीवनाच्या गाण्यातील एक स्वर, प्रत्येक सुगंध जणू आत्म्याच्या वीणेतील एक नाद. जाई-मोगऱ्याच्या शुभ्र पाकळ्या म्हणजे शांततेचे पांढरे पंख, गुलाबाची लालिमा म्हणजे प्रेमाचा दीप, तर फुलपाखरांची रंगीत उधळण म्हणजे आनंदाचा उत्सव. देवाच्या चरणी अर्पण झालेला गजरा हा केवळ फुलांचा हार नसतो, तर तो श्रद्धेची सुगंधी ओंजळ असतो. हा सुगंध, हा वास नसून मनशांतीचा अदृश्य प्रवाह आहे, जो थकलेल्या आत्म्याला स्पर्शून जातो, त्याला प्रसन्नतेचे स्नान घडवतो. जसा पावसाचा पहिला थेंब जमिनीला तृप्त करतो, तसा गजऱ्याचा सुगंध मनाला तृप्त करतो.
गजऱ्याचा हार म्हणजे आठवणींचा हार. आईच्या वेणीतील मोगऱ्याचा गजरा, वधूच्या केसांतील जाईचा गजरा, उत्सवात देवीच्या मूर्तीवर सजलेला गजरा प्रत्येक ठिकाणी तो आनंद, भक्ती आणि सौंदर्याचा सुगंध पसरवतो. जसा दीप अंधार दूर करतो, तसा गजरा मनातील काळोख दूर करतो. जसा धूप वातावरण शुद्ध करतो, तसा गजरा मनाच्या खिडकीतून येणारा शीतल वारा ठरतो. गजरा म्हणजे ललित सौंदर्याची रम्य रचना, जिथे सुगंध हा भक्तीचा स्वर होतो, रंग हा श्रद्धेचा तेज बनतो आणि गुंफण ही शरणागतीची ओंजळ ठरते. तो केवळ पूजेतील साहित्य नाही, तर मनाने पुन्हा पुन्हा अनुभवावा अस वाटणारी अनुभूती आहे. गजऱ्याचा सुगंध जसा केसांत गुंफला जातो, तसाच तो मनाच्या गाभाऱ्यात गुंफला जातो आणि तिथेच तो शाश्वत ठसा उमटवतो, पुन्हा पुन्हा उमलणारा, पुन्हा पुन्हा सुगंध पसरवणारा, पुन्हा पुन्हा भक्तीचा दीप उजळवणारा.






