Thursday, January 8, 2026

उत्तर महाराष्ट्रात भाजप–शिवसेनेतच रंगणार तुल्यबळ लढत

उत्तर महाराष्ट्रात भाजप–शिवसेनेतच रंगणार तुल्यबळ लढत

धनंजय बोडके

महापालिका निवडणुकीत माघारीनंतर सर्वच प्रभागांतील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. स्वबळावर लढणाऱ्या भाजपमध्ये निष्ठावंतांना उमेदवारी डावलत आयारामांना संधी दिली गेल्यामुळे अपक्षरूपी बंडखोरीचे पीक उभे राहिले असताना, राज्याच्या सत्तेतील घटकपक्ष असलेली शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षच भाजपसमोर प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रूपाने उभे राहिल्याने महापालिका निवडणुकीत खरी लढत ही महायुतीतच होत असल्याचे दिसत आहे.

सुमारे आठ वर्षांनंतर होणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष युद्धपातळीवर तयारी करत असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध मंत्री व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये जाहीर सभा व प्रचारासाठी येणार आहेत. २०१७ प्रमाणेच यंदाही नाशिकमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतच खरी तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र सध्याच्या प्रचारातून स्पष्ट होत आहे. मुंबई आणि पुण्यानंतर वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण झाली आहे. ‘सुवर्ण त्रिकोण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराने औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व पर्यटन क्षेत्रात मोठी प्रगती केली असून, त्यामुळेच नाशिक महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रारंभी काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी, पुढे शिवसेना, भाजप युतीची सत्ता महापालिकेत आली. २०१७ पर्यंत एकहाती सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ शकली नाही; परंतु २०१७ मध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवत १२२ पैकी ६६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी शिवसेनेला ३५ जागांवर समाधान मानावे लागले होते, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ६ तर मनसेला ५ जागा मिळाल्या होत्या. तत्पूर्वी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ४० जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपच्या पाठिंब्यावर मनपाची सत्ता हस्तगत केली. मनसेचे अशोक मुर्तडक आणि ॲड. यतीन वाघ यांना महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली. महापालिकेपूर्वी २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक शहरात तीन आमदार निवडून आले होते. या आमदारांच्या दमदार कामगिरी आणि प्रयत्नांनी २०१२ मध्ये मनपा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. मात्र त्यानंतर २०१७ मध्ये मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही .

तीन, चार वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर २ गट निर्माण झाले. नाशिकमध्ये प्रारंभी एकनाथ शिंदे यांच्याकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. मात्र त्यानंतर मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सत्तेत असल्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद उत्तरोत्तर वाढत गेली. नाशिकमध्ये भाजप प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र होते. भाजपने इतर पक्षांतील अनेक प्रबळ व प्रभावी नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. परिणामी एका नगरसेवक पदासाठी किमान पाच-पाच तुल्यबळ उमेदवार इच्छुक असल्याची स्थिती निर्माण झाली. मात्र त्यातील एकालाच उमेदवारी मिळाल्याने उर्वरित नाराज उमेदवारांनी शिंदे गटाची शिवसेना, महाविकास आघाडी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एबी फॉर्म वाटपाच्या वेळी सर्वच पक्षांत गोंधळ उडाला. काँग्रेसने देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कमिटीला कुलूप लावले, तर शिंदे सेनेत देखील निष्ठावंत आणि उपरे अशा वादाचा अंक बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात देखील काही ठिकाणी नाराजी बघायला मिळाली. मात्र उमेदवार, इच्छुकांची सर्वाधिक दमछाक भाजपमध्ये झाल्याचे चित्र नाशिककरांनी पाहिले. गेल्या आठ दिवसांत उमेदवारीवरून निर्माण झालेला गोंधळ आणि अनेक चांगले उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे भाजपला सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक आता तुल्यबळ वाटू लागली आहे.

दुसरीकडे, गेल्या पंधरा दिवसांत शिवसेनेने घेतलेली मुसंडी भाजपसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमध्ये येऊन उत्तर महाराष्ट्रातील प्रचाराचेे रणशिंग फुंकला आहे. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सभेलाही नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते जाहीर सभा व प्रचारासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. शिवसेनेच्या बाजूनेही प्रचाराला वेग आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये रोड शो घेत नवचैतन्य निर्माण केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे विविध प्रमुख नेते भव्य जाहीर सभांच्या माध्यमातून प्रचारात उतरणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेतेही नाशिकमध्ये प्रचारासाठी येणार असले तरी मोजक्याच प्रभागांत तुल्यबळ उमेदवार दिसून येत असल्याने, सध्या तरी त्यांचा प्रभाव मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेची खरी लढत भाजप आणि शिवसेनेतच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अखेर या तुल्यबळ लढतीत बाजी कोण मारणार, महापालिकेचा महापौर कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या युतीचा होणार, हे मात्र येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. नाशिककरांची उत्सुकता आता निकालाकडे लागली आहे.

नगर परिषद निवडणुकीत शिवसेना नंबर एकवर

राज्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत राज्यांत भाजपने अभूतपूर्व यश मिळविले. मात्र नाशिक अपवाद ठरले होते. नाशिक जिल्ह्यात ११ पैकी सर्वाधिक ५ नगराध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ३ ठिकाणी विजय मिळाला.

Comments
Add Comment