कांदिवली : कांदिवली पश्चिमेला एस. व्ही. रोड आणि चारकोप येथील सह्याद्री नगर समोरील मुख्य मार्गाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या मार्गांवर असंख्य बस थांबे असून प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. मुख्य मार्गाचा अर्धा भागाचे काँक्रिटी करण बाकी असल्याने, बस प्रवाशांना बस रस्त्याच्या मधोमध उभे राहून तारेवरची कसरत करत बस पकडावी लागत आहे. अडचणी मधून मार्ग काढत बस पकडताना अपघात होण्याची भीती जेष्ठ नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. बस थांब्याजवळील मार्गाचे काम तातडीने करावे अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.
स्वामी विवेकानंद मार्गांवर कांदिवली पोलीस ठाणे परिसरात तसेच चारकोप सह्याद्रीनगर मार्गांवरील रस्त्याच्या अर्ध्या भागाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम बाकी आहे. यामुळे पदपथाकडील भाग एक फूट खाली आहे. बस प्रवाशांना काँक्रिटीकरण झालेल्या भागावर उभे राहून बस पकडावी लागत आहे. सुरक्षिततेसाठी लोखंडी बेरिकेड्स लावण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना बेरिकेड्सच्या मधे उभे राहावे लागत आहे. पाठीमागे एक फुटाचा खोल मार्ग, बाजूला लोखंडी बेरिकेड्स अशा धोकादायक परिस्थितीत ईच्छित बस पकडताना तारेवरची कसरत करत बस पकडावी लागत आहे.
विशेष म्हणजे काँक्रिटीकरण झालेल्या अर्ध्या भागावर प्रवासी उभे राहतात. यामुळे बस देखील मार्गांवरच उभी केली जाते. बस थांबल्याने वाहतुकीची कोंडी होते. बस पकडताना अडचणींचा सामना करावा लागतो.






