काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण तापले आहे. यंदा मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन शिवसेना, भाजप व एमआयएम पक्ष येथे ताकदीने निवडणूक लढवत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीही मैदानात आहे. एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून माजी खासदार व पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा येथे एमआयएमचे कार्यकर्ते व एमआयएमचे नाराज गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. एमआयएम कार्यकर्ते व नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून नाराज कार्यकर्त्यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला, तर काहींनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.
काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी हल्ला केल्याचा आरोप
इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा परिसरातून जात असताना काही तरुणांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रॅली पुढे गेली, पण रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने चाल करून आले. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. जलील यांनी हा हल्ला कॉँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी केल्याचा आरोप केला.






