गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच विराट कोहली वडोदऱ्यात दाखल झालं असून, विमानतळावरून चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. आणि स्वागतवेळी एअरपोर्टवर विराटला बघण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने काळया रंगाचा टी -शर्ट आणि काळा चष्मा घातला होता. चाहत्यांचा उत्साह इतका होता की प्रत्येकजण विराटला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये रंगणार मोठा सामना
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५–२६ स्पर्धेत तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसला. अवघ्या दोन सामन्यांत विराटने २०८ धावा करत आपली छाप पाडली आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने दमदार १३१ धावांची खेळी साकारली, तर गुजरातविरुद्ध ७७ धावा ठोकल्या.
या कामगिरीदरम्यान विराट कोहलीने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा पार केला. विशेष म्हणजे, सर्वात जलद १६ हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.
#WATCH | Gujarat: Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli arrives at Vadodara for Team India's ODI match against New Zealand on 11th January. pic.twitter.com/cQbhCghMZy
— ANI (@ANI) January 7, 2026
शानदार फॉर्ममध्ये विराट कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. सुरुवातीच्या दोन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला असला, तरी त्यानंतर त्याच्या बॅटने जोरदार पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावत एकूण ३०२ धावा केल्या. यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही केवळ दोन सामन्यांत २०८ धावा करत विराटने आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
दरम्यान, विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ हजार धावांचा टप्पा गाठण्यापासून अवघ्या २५ धावा दूर आहे. हा टप्पा पार केल्यानंतर तो सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्या पाठोपाठ हा पराक्रम करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल .






