नवी मुंबई : नवी मुंबईकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सिडकोकडून साई गावाजवळील मुख्य जलवाहिनीवर तातडीची दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आल्याने आज, बुधवार ७ जानेवारी रोजी शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा तब्बल सात तास बंद ठेवण्यात येणार आहे. अचानक जाहीर झालेल्या या पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार , सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत खारघर, तळोजा, उवा आणि द्रोणागिरी परिसरात नळ कोरडे राहणार आहेत. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू होणार असला तरी सुरुवातीला कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणातच पाणी उपलब्ध होईल. सात तासांचा पाणीपुरवठा बंद असल्याने गृहिणी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, नवी मुंबईकरांना गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा पाणीपुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे. १९ डिसेंबर रोजी वायल आणि ठोंबरेवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी कळंबोली, नवीन पनवेल आणि करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, सिडकोच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पाणीपुरवठा कधीही खंडित होणार याची पूर्वसूचना वेळेवर मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने दुरुस्तीची कामे सुरू असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत?, असा सवाल आता नवी मुंबईकर विचारू लागले आहेत.






