देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
धुळे (प्रतिनिधी) : राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उबाठाप्रमुखांनी केली. तसेच निवडणूक आयोग भाजपाच्या सांगण्यानुसार काम करत असल्याचे आरोपही उद्धवसेनेकडून सातत्याने करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावरून मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
‘या वेळेला आपण सर्वांनी कमाल केली आहे. सर्वत्र निवडणुकांचे वातावरण आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण धुळ्यात सुरुवातीलाच चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तुम्ही बिनविरोधचा चौकार लगावला आहे. धुळ्यामध्ये भाजपने चार नगरसेवक निवडून आणले आहेत. पण आपले नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यामुळे काही लोकांना मात्र मिर्ची झोंबली आहे. अब तुमको मिर्ची लगी तो मै क्या करु’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला.
देशाच्या लोकसभेमध्ये तब्बल ३५ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसच्या काळात निवडून आले आहेत. खासदार जेव्हा बिनविरोध निवडून येतात तेव्हा लोकशाही जिवंत असते आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक बिनविरोध दिले, तर लोकशाहीचा खून झाला. असे म्हणणाऱ्यांचे डोके नेमके कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आमची जनता आमच्यावर प्रेम करते. आम्ही जनतेचे स्वीकारतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. प्रत्येक शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पांझरा नदी काठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार काशिराम पावरा, आमदार राम भदाणे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, कुणाल पाटील, रवि अनासपुरे, माजी आमदार कदमबांडे, नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, ज्योती चौरे, चिंतनभाई पटेल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बापू खलाणे, संजय शर्मा, माजी महापौर प्रदीप कर्पे, चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव तसेच भाजपाचे सर्व उमेदवार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अमृत योजनेअंतर्गत धुळे शहरात ७१७ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना सुरू आहे. काँग्रेसच्या काळात ५० कोटी रुपयेही मिळत नव्हते, मात्र मोदी सरकारने धुळ्यासारख्या शहराला ७०० कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे फडणवीस आहे.






