उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका निवडणुकीतील राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या संपूर्ण पॅनेलने ऐनवेळी अर्ज मागे घेत, शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकारामुळे पक्षनिष्ठा, तत्त्व आणि विचारधारा यापेक्षा संधी महत्त्वाची ठरते का, असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.
या प्रभागात नीलेश बोबडे, रवी वसिटा, सुरज कारकर आणि एक महिला उमेदवार हे सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली व राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडून उमेदवारी अर्ज दाखल केला; परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या चारही उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेत,थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. परिणामी, प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे संपूर्ण पॅनलच निवडणूक रिंगणातून बाहेर पडले.
तर अर्ज मागे घेण्याबाबत सुरज कारकर म्हणाले की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज भरला होता, पण अर्ज मागे घेतल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला खेद आहे. तसेच शिवसेनेचा आणि आमचा दृष्टिकोन एकच असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या पॅनलमधील काही उमेदवारांनी अवघ्या दोन दिवसांत भाजप - राष्ट्रवादी अजित पवार गट- शिवसेना शिंदे गट असा राजकीय प्रवास केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या घटनेमुळे निवडणुकीतील पक्षनिष्ठा, विचारसरणी आणि राजकीय नैतिकता या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याच्या भावणा स्थानिक मतदारांनी व्यक्त केल्या.






