भाईंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पालिकेत महिलाराजच राहिलेले आहे. या काळात झालेल्या आठपैकी सहा वेळा महापौर बनण्याचा मान महिलांना मिळाला. त्यापैकी चार माजी महापौरांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार माजी महापौर विविध प्रभागांतून लढत देत आहेत. यातील तीन माजी महापौर भाजपकडून, तर एक माजी महापौर शिवसेनेकडून नशीब अजमावत आहे. महापौर पद हे सर्वाधिक काळ महिलांकडे राहिले तर उपमहापौरपदी सर्वाधिक काळ पुरुषांकडे राहिले. आठपैकी सात वेळा पुरुष उपमहापौर राहिले आहेत; मात्र त्यापैकी केवळ भाजपचे हसमुख गेहलोत माजी उपमहापौर निवडणूक लढवत आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कार्यकाळात गेहलोत उपमहापौरपदी विराजमान होते.
निर्मला सावळे : मीरा-भाईंदर महापालिकेची २००२ मध्ये स्थापना झाल्यानंतर दुसरा महापौर होण्याचा मान निर्मला सावळे यांना मिळाला होता.
कॅटलीन परेरा : कॅटलीन परेरा माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या कन्या आहेत. २०१२ मध्ये महापौरपदी विराजमान झाल्या. शिवसेनेच्या विभाजनानंतर त्या शिंदे गटासोबत राहिल्या. त्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग आठमधून निवडणूक रिंगणात आहेत.
डिंपल मेहता : भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांच्या गळ्यात २०१७ मध्ये माळ पडली. आता त्या पुन्हा एकदा मीरा रोड येथील प्रभाग १२ मधून निवडणूक लढवत आहेत.
जोत्स्ना हसनाळे : २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपतना ज्योत्स्ना हसनाळे महापौर होत्या. काशीमीरा येथील प्रभाग १४ मधून भाजपच्या तिकीटावर त्या नशीब अजमावत आहेत.






