Wednesday, January 7, 2026

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे दोन्ही एकदमच घोर संकटात सापडले आहेत, अशी चिंता लोकसंख्या विज्ञानाच्या तज्ज्ञांनी नुकतीच व्यक्त केली. वांद्रे हिंदू असोसिएशनच्या सभागृहात रविवारी ‘मुंबईतील अवैध स्थलांतर’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. त्यात या तज्ज्ञांनी ही काळजी व्यक्त केली. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज’चे माजी संचालक डॉ. एस. के. सिंह यावेळी म्हणाले की, भारतात विकास होत असतानाच बेकायदा स्थलांतरेही होत आहेत. सध्या भारतात बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार म्हणजे आधीचा ब्रह्मदेश अशा तीनही शेजारी देशांमधून असंख्य घुसखोर घुसत आहेत. त्यांच्यामुळे भारताच्या विकासयात्रेला खीळ बसते, अशी चिंता डॉ. सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

एका बाजूला पैशासाठी घुसखोरांना प्रवेश देणाऱ्या यंत्रणा आणि दुसरीकडे विशिष्ट समुदायाच्या लोकांना भारतात वसविण्याची काही राजकीय शक्तींची धडपड, या दुहेरी पेचाचे विस्तृत विवेचन डॉ. सिंह यांनी यावेळी केले. घुसखोरी केल्यानंतर आधी ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये तळ टाकायचा आणि नंतर आधीच घुसखोरी केलेल्या घुसखोरांच्या मदतीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद.. अशा महानगरांमध्ये बस्तान बसवायचे, अशी या घुसखोरांची पद्धत असते. तिचे विवरण करून डॉ. सिंह यांनी हे घुसखोर त्या त्या शहरातील राजकीय लोकांना हाताशी धरून सोयीसुविधा पदरात पाडून घेतात, असे निदर्शनास आणून दिले. या लोकांना मदत करण्यात अनेकदा स्थानिक नगरसेवक, स्थानिक पुढारीच पुढे असतात. पैशाच्या लोभापायी या घुसखोरांना आश्रय आणि मदत केली जाते.

या घुसखोरांचा मोठा धोका म्हणजे यातलेच काही अवैध धंदे, अमली पदार्थांचा व्यापार, दहशतवाद आणि इतर जिहादी कारवाया यांच्यात गुंतलेले असतात. अशा धोकादायक घुसखोरीमुळे देशातल्या प्रत्येक राज्यातल्या काही भागांमधील लोकसंख्येची भूमिती कशी बदलत आहे, यावर डॉ. सिंह यांनी प्रकाश टाकला. घुसखोरांमुळे बिघडणारे सामाजिक वातावरण, लव्ह जिहादच्या घटना, निवडणुकांमधील जिहादी प्रभाव, धोरणांचे ध्रुवीकरण आदी मुद्देही यावेळी चर्चेत मांडण्यात आले. सरकारी धोरण किंवा योजनांना सामूहिक विरोध करण्याची घुसखोरांची पद्धत कशी असते, यावरही डॉ. सिंह यांनी विवेचन केले.

घुसखोर स्थानिक रोजगारावर गदा आणतात. आधी कमी पैशात सेवा देतात. सध्या मुंबईतले अनेक ठेले तसेच घरपोच सेवा देणाऱ्या पोर्टल्समध्ये बेकायदा घुसखोरांचे प्रमाण चिंता करण्याइतके वाढल्याचे डॉ. सिंह यांनी दाखवून दिले. रोजंदारीची हजारोकामे तसेच बांधकाम उद्योग इथेही घुसखोरांचे प्राबल्य असल्याचे ते म्हणाले. घरकामासाठी येणाऱ्या महिलांमध्येही घुसखोर महिलांचे प्रमाण वाढत आहे. यावेळी, गलगुट विद्यापीठातील सहायक प्राध्यापक सौविक मोंडल यांनीही विस्तृत आकडेवारी सादर करून घुसखोरीचे वाढते प्रमाण आणि तिचे विविध क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम यांचे सादरीकरण केले. घुसखोर समाजाची सारी रचनाच बिघडवून टाकतात, असे निरीक्षण यावेळी अॅड. सर्वेश मेहेंदळे यांनी नोंदविले. वांद्रे हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष अजित मनियाल यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साह्य केले.

Comments
Add Comment