Wednesday, January 7, 2026

Thane Metro : वडाळा ते कासारवडवली प्रवास आता सुसाट! मेट्रो ४ मुळे मुंबई-ठाणे येणार अधिक जवळ, मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितला पूर्ण 'प्लॅन'

Thane Metro : वडाळा ते कासारवडवली प्रवास आता सुसाट! मेट्रो ४ मुळे मुंबई-ठाणे येणार अधिक जवळ, मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितला पूर्ण 'प्लॅन'
ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४-ए (कासारवडवली-गायमख) बाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा २०२६ मध्ये प्रवाशांसाठी खुली होणार असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा मुंबईचा प्रवास सुसाट आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा प्रगती अहवाल सादर करताना मंत्री सरनाईक यांनी या मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर आढावा दिला. ते म्हणाले की, या संपूर्ण मेट्रो मार्गिकेचे काम एकूण तीन मुख्य टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. तांत्रिक सोय आणि प्रवाशांची निकड लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार असून, २०२६ पर्यंत प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाला झालेल्या विलंबाबाबत बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय स्तरावर काही कामांना विलंब झाला होता. मात्र, आता आचारसंहितेचा अडथळा दूर झाल्याने प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. वडाळा, विक्रोळी ते थेट कासारवडवली असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मार्गिका संजीवनी ठरणार आहे.
ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाणे मेट्रोच्या कामात स्वतः सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. २०२६ मध्ये ही मेट्रो रुळावर धावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाबाबत मुंबई आणि ठाणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मार्ग कसा असणार?

प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोचा सर्वात पहिला टप्पा ठाणे शहरांतर्गत असेल. कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा १०.५ किलोमीटर लांबीचा मार्ग मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये कासारवडवली ते गायमुख या २.७ किलोमीटरच्या मेट्रो लाईन ४-ए विस्ताराचाही समावेश असेल. हा टप्पा सुरू झाल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मोठी सुटका होणार आहे. पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत, म्हणजेच २०२६ च्या अखेरीस, दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. हा टप्पा गायमुखपासून विक्रोळीतील गांधी नगरपर्यंत असेल, ज्याची लांबी सुमारे १० किलोमीटर आहे. या टप्प्यामुळे ठाणे आणि मुंबईच्या उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. मेट्रो लाईन ४ चा शेवटचा टप्पा जो विक्रोळी ते वडाळ्यापर्यंत आहे, तो २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वडाळ्यापर्यंतचा मार्ग पूर्ण झाल्यावर ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघाचा प्रगती अहवाल सादर करताना सरनाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वश सरनाईक देखील उपस्थित होते. "आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असून, विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहोत," असा दावाही त्यांनी यावेळी केला. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सादर केलेला हा विकास अहवाल आणि मेट्रोची डेडलाईन ठाणेकरांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
Comments
Add Comment