पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे असे आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. दिवंगत सूरज मराठे ३० वर्षांचे होते. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
मूळचे देहूचे रहिवासी असलेल्या सूरज मराठे यांची महिन्याभरापूर्वी तासगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. अविवाहीत असलेल्या सूरज मराठे यांना मागील काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. या गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी सूरज मराठे यांनी काही वैद्यकीय चाचण्या करुन घेतल्या होत्या. चाचण्यांचे अहवाल हाती आल्यानंतर सूरज चव्हाण यांनी टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येआधी सूरज मराठे यांनी पोलिसांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत वैद्यकीय कारणामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट नमूद आहे. वैद्यकीय कारणाचे तशील अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी सूरज मराठे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.






