मुंबई : काही पक्ष राजकीय स्वार्थासाठी मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकार असेच सुरू राहिले तर डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बाँडी बीचवर दिसलेलं दृष्य भविष्यात मुंबईत गिरगाव बीचवर पण दिसू शकते. अतिरेकी, समाजविघातक शक्ती मंबईत धुमाकूळ घालू शकतात.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला २५ वर्षे सत्तेत असताना मुंबईच्या भल्यासाठी काही करण्याची इच्छा झाली नाही. आता जाहीरनामा काढून मुंबईकरांनी जी आश्वासने देत आहेत, ती कामे २५ वर्षांत का केली नाहीत, असा प्रश्न मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांनी केला. यावेळी त्यांनी मुंबईला भेडसावणाऱ्या समस्यांवर एक प्रेझेंटेशनही दिलं. यावेळी या पत्रकार परिषदेसाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, श्वेता परुळकर हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना अमीत साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "मुंबई शहराला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मिळावं यासाठी ही निवडणूक घेतली जात आहे. गेल्या ११ वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जसा मुंबईचा विकास झाला तसाच विकास मुंबईच्या महानगरपालिकेचा व्हावा याकरिता ही निवडणूक आहे. मुंबईला चांगले रस्ते, पाणी, उद्याने, फेरीवाला क्षेत्र या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी ही निवडणूक आहे. तसेच मुंबईचा विकास होत असताना सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंबई शहराच्या अवती-भोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाला परतवून लावण्यासाठी ही निवडणूक आहे."
ते पुढे म्हणाले, "१९९७ पासून आजपर्यंत मुंबई शहराचे लोकसंख्याशास्त्र हे बदलले आहे. ८८ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. तर ८ टक्क्यांपासून ते २१ टक्क्यांपर्यंत मुस्लीम समाजाची लोकसंख्या मुंबई शहरामध्ये वाढलेली आहे. मुंबई शहरामध्ये विविध प्रकारचे दबावगट सध्या कार्यरत आहेत. मुंबईमध्ये सध्या वोट जिहाद घडवून आणला जात आहे. सरकारी जमिनींचा ताबा घेऊन त्यावर झोपड्या उभारून नंतर तिथे बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना आणून आपल्या राजकीय पदाचा वापर करून त्यांना अधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र देऊन हा वोट जिहाद जाणिवपूर्वक घडवून आणला जात आहे."
अमीत साटम म्हणाले, "मुंबईतील मालवणी, मालाड, कुर्ला, चांदिवली या भागात सन २०१७ च्या तुलनेत मतदारांची संख्या कशी वाढली हा प्रश्न मुंबईकरांना पडतो. खासकरून मालवणी-मालाड येथे २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि २०२४ ची विधानसभा निडवडणूक या ४ महिन्यांच्या काळात १० हजारांपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि हे मतदार वोट जिहादमुळे वाढलेले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात अस्लम शेख नावाचा पालकमंत्री होता. ज्याने काल झोरावर ममदानीसारखा महापौर मुंबईत असला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. या झोरावर ममदानीने उमर खालदीप्रती सहानुभूती दर्शवली होती. तसेच 'भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह', 'हमे चाहिए आझादी हिंदुओंसे आझादी' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या."
१यापुढे ते म्हणाले, "एकीकडे अशाप्रकारचे मतदार वाढत असताना गेल्या ११ वर्षांत सर्वात चांगली गोष्ट कोणती झाली असेल तर ती बीबीडी चाळीतील लोकांना ५६० फुटांचं घर त्याच भागात देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम आहे. हे मराठी माणसासाठी केलेलं मोठं काम आहेच पण यासोबतच मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्यासाठी उचललेलं मोठं पाऊलही आहे. उद्धव ठाकरेंना खान आणि शेख चालतात पण मराठमोळे देशपांडे आणि धुरी यांच्यासारखी माणसं चालत नाही हे संतोष धुरी यांच्या पक्षप्रवेशानंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धवजींपासून ते उद्धवमामूंपर्यंत यांचा प्रवास झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय कटकारस्थांनांमध्ये हे भागिदार झालेले आहेत. स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी देशविरोधी, आतंकवादी, समाजविघातक कारवाया करणाऱ्या शक्तींबरोबर आता ते हात मिळवत आहेत."
याशिवाय मागच्या वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशाप्रकारे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये काम केलं आहे याचा संक्षिप्त आढावाही यावेळी अमीत साटम यांनी घेतला. "सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला भोंगामुक्त केलं. तसेच मोठ्याप्रमाणावर मुंबईमधील बांग्लादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचं काम श्री. फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यामुळे भविष्यातही आम्ही या शहराचा रंग बदलू देणार नाही आणि अशा प्रकारच्या देशविघातक शक्तींना या ठिकाणी थारा देणार नाही." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






