Wednesday, January 7, 2026

Pune Crime News : आधी अपहरण, मग हत्या अन् थेट...पुण्यातील १७ वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, भयानक प्रकार उघड

Pune Crime News : आधी अपहरण, मग हत्या अन् थेट...पुण्यातील १७ वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, भयानक प्रकार उघड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा वापर करून एका १७ वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अमनसिंग सुरेंद्रसिंह गच्चड (वय १७, रा. विश्रांतवाडी) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

इन्स्टाग्रामवर रचला मृत्यूचा सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अमनसिंगला जाळ्यात ओढण्यासाठी इन्स्टाग्रामचा आधार घेतला. एका मुलीच्या बनावट किंवा ओळखीच्या अकाऊंटवरून अमनसिंगला मेसेज करण्यात आले आणि त्याला कात्रज परिसरात भेटण्यासाठी बोलावण्यात आले. आपण एका मुलीला भेटायला जात आहोत या समजुतीने अमनसिंग तिथे पोहोचला, मात्र तिथे आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याचे अपहरण केले. आरोपींनी अमनसिंगला कात्रजवरून जबरदस्तीने खेड शिवापूर परिसरात नेले. तिथे निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर दगड आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की अमनसिंगचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पुणे पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत या प्रकरणाचा छडा लावला.

पोलिसांची मोठी कारवाई

या भीषण हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या दोन विधिसंघर्षित (अल्पवयीन) मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

जुने भांडण आणि 'हनी ट्रॅप'चा बनाव

मिळालेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर रोजी अमनसिंग आपली गाडी घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्र झाली तरी तो परतला नाही. दोन दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर, अखेर त्याच्या आईने ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मुलाचे वय कमी असल्याने आणि परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. विश्रांतवाडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने अमनसिंगच्या मोबाईलचा सीडीआर (Call Detail Record) आणि तांत्रिक लोकेशन तपासले. तपासात असे समोर आले की, अमनसिंगला शेवटचे कात्रज आणि त्यानंतर उत्तमनगर परिसरात पाहिले गेले होते. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीनुसार तपास केला असता, जुन्या भांडणातून प्रथमेश आढळ, नागेश धबाले आणि त्यांच्या अल्पवयीन मित्रांनी अमनसिंगचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. अमनसिंगची हत्या केल्यानंतर आरोपींनी राज्याबाहेर पळ काढला होता. ते कर्नाटकातील बेळगावमध्ये लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ बेळगावात जाऊन सापळा रचला आणि प्रथमेश आढळ व नागेश धबाले या दोन प्रमुख आरोपींसह त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी एका मुलीच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर अमनसिंगशी संपर्क साधला आणि त्याला कात्रज येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथून त्याचे अपहरण करून त्याला खेड शिवापूर येथील निर्जन स्थळी नेले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिथे त्याच्यावर दगड आणि कोयत्याने सपासप वार करून त्याला संपवले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >