मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते इंधनापर्यंत अनेक गोष्टींचे भाव गगनाला भिडले असतानाच, आता सराफा बाजारातून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर असलेल्या सोन्याच्या दरात आता घसरण होणार असून, यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकीकडे सोन्याच्या दरात घसरण होत असताना, दुसरीकडे मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असूनही, भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. इंधन दर कमी झाल्यास मालवाहतूक स्वस्त होऊन महागाईवर नियंत्रण मिळवता येईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
जूनपर्यंत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार
वाढत्या इंधन दरामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. २०२६ या वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरण्याची शक्यता असून, परिणामी येत्या जून महिन्यापर्यंत भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) रिसर्च रिपोर्टमध्ये हा महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या अहवालानुसार, सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी पडझड पाहायला मिळत आहे. सौदी अरेबिया आणि रशियासह 'ओपेक प्लस' (OPEC+) देशांनी तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेत तेलाचा पुरवठा वाढल्यामुळे किमती कमी होत आहेत. सध्या भारतीय क्रूड बास्केटचे दर हे सुमारे ६२.२० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत, जे जून २०२६ पर्यंत ५० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात.
इंधन दरात कपात झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा दिलासा
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे थेट परिणाम आता भारतीय ग्राहकांच्या खिशावर दिसू लागणार आहेत. ताज्या आर्थिक अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत जर १४ टक्क्यांची मोठी घट झाली, तर त्याचे दूरगामी परिणाम देशातील महागाईवर होतील. यामुळे केवळ पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार नाही, तर देशाचा एकूण महागाई दर ३.४ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा सर्वसामान्यांसाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे.






