नाशिक : महाराष्ट्रामध्ये वाहनांच्या अपघातांची मालीका सुरुच.. काल मंगळवारी साक्री-शिर्डी राष्टिय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ढोलबारे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात नवापूर तालुक्यातील आमलीपाडा (जि. नंदुरबार) येथील नवरा बायकोचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संदीप दासू गावित (वय ३५) व त्यांची पत्नी आशा संदीप गावित (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीतून समजलं आहे.. हे दांपत्य नवापूरहून येवला येथे आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करत होते. सकाळी ७.३० सुमारास ढोलबारे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली. या भीषण अपघातात संदीप आणि आशा गावित यांचा जागीच मृत्यू झाला. क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन चिमुकल्या मुलांचे आई-वडील कायमचे हिरावले गेले आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. साक्री–शिर्डी महामार्गावरील अपूर्ण काम, दिशादर्शक फलकांचा अभाव, दुभाजक नसणे आणि धोकादायक वळणे यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केले आहेत..






