मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी
जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिका प्रचारार्थ आयोजित रोड शोला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महायुतीने शहरात शक्ती प्रदर्शन केले. सायंकाळी महापालिका निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री यांचे धुळयाहून आगमन जळगाव शहरात झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली. जिल्हाभरातून पदाधिकारी, निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक शहरात भाजपा कार्यालयात दाखल झाले, रोड शोमध्ये दोन रथांचे आयोजन करण्यात आले. त्यात एका रथात सर्व निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक तर, दुसऱ्या रथात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील,संजय सावकारे, गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी होते. या रोड शोमध्ये दहा हजारांवर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.
जळगाव शहराच्या विकासासाठी मदत करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना काँग्रेसच्या काळात शहर विकासासाठी ५० कोटी देखील मिळाले नव्हते असे सांगून जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही हजार कोटी दिले. आतापर्यंत ८६३ कोटींची विकासकामे दिली. यापुढे शहराच्या विकासासाठी पैसा देत राहू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुढील पाच वर्षांत जळगाव स्मार्ट सिटी करण्याचा संकेत दिला. जळगावात उदयोग यावेत म्हणून जळगाव एमआयडीसीला डी दर्जा देण्यात आला आहे, यामुळे येथे सबसिडी मिळत असल्याने शहरात आता नवे उद्योग येतील, असे त्यांनी सांगितले.






