Wednesday, January 7, 2026

रहमान यांचे परतणे भारताच्या पथ्यावर?

रहमान यांचे परतणे भारताच्या पथ्यावर?

- प्रा. जयसिंग यादव (लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

बांगलादेशमध्ये लवकरच होणाऱ्या निवडणुकीआधी भारतविरोधी भावना भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असताना माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रहमान बांगलादेशमध्ये परतले. त्यांचे झालेले उत्स्फूर्त स्वागत पाहता ते पंतप्रधानपदी निवडून येऊ शकतात. सध्याच्या अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस मोहम्मदइतके ते पाकिस्तानधार्जिणे नसल्याने त्यांचे परत येणे भारताच्या पथ्यावर पडू शकते.

बांगलादेश विजय दिनाच्या दोन दिवसांनंतर १८ डिसेंबरच्या रात्री दोन प्रमुख माध्यम आउटलेट्स आणि अनेक सांस्कृतिक संस्थांवर जमावाचा हल्ला झाला. इन्कलाब मंचचे संयोजक आणि प्रवक्ते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने प्रथम ‘आलो’ आणि ‘द डेली स्टार’ या दोन माध्यमांच्या कार्यालयावर तसेच छायानौत भवनवर हल्ला केला. तोडफोड केली आणि आग लावली. या संस्थांना ‘भारताचे एजंट’ आणि ‘फॅसिझमचे मित्र’ असे संबोधले गेले. भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत केली होती; परंतु तेव्हापासून सीमावर्ती भागात पाणीवाटपात भारताची भूमिका किंवा अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याच्या आरोपांमुळे बांगलादेशमध्ये भारतविरोधी भावना वारंवार उफाळून येत असतात. अलीकडील हल्ले हे बांगलादेशी राजकारणात भारतविरोधी भावनांचा वेळोवेळी वापर सुरू असल्याचे अनेकांचे मत आहे. अंतरिम सरकारच्या १६ महिन्यांच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्था ही एक प्रमुख समस्या राहिली आहे. आता या अस्थिर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी निवडणुका हा एकमेव मार्ग आहे. अनेक राजकारण्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की एक गट भारतविरोधी भावनांचा फायदा घेऊन आगामी निवडणुकांमध्ये व्यत्यय आणत हिंसाचार भडकवत आहे. एकीकडे ही स्थिती असताना बांगलादेशमधील प्रमुख राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षा(बीएनपी)ला आता नवसंजीवनी मिळणार आहे. त्याचे कारण आतापर्यंत युनूस हे पाकिस्तानधार्जिण्या मूलतत्त्ववादी पक्षांच्या कलाने निर्णय घेत होते. अवामी लीग हा या पूर्वीचा सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असणार नाही. ‘बीएनपी’चे अनेक नेते तुरुंगात आहेत. बरेच वयोवृद्ध झाले आहेत. हसीना यांच्याविरोधातील आंदोलनात ‘बीएनपी’ची फारशी भूमिका नव्हती. त्यामुळे ‘बीएनपी’ निवडणुकीच्या शर्यतीत राहणार नाही,असा एक मतप्रवाह होता; परंतु आता तारिक रहमान यांचे १७ वर्षांनंतर बांगलादेशमध्ये आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागताला लोटलेला लाखोंचा जनसमुदाय पाहिला, की बांगलादेशच्या राजकारणाची समीकरणे बदलतील, असे अनेकांना वाटायला लागले आहे. १७ वर्षांपासून त्यांचा चेहरा ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’(बीएनपी)च्या पोस्टर्सवर दिसत होता. त्यांचा रेकॉर्ड केलेला आवाज सतत ऐकू येत असे. नुकत्याच निवर्तलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि एके काळी देशाच्या राजकारणाचे ‘डार्क प्रिन्स’ म्हणून ओळखले जाणारे तारिक रहमान यांच्या हाती पक्षाची सूत्रे जातील, असा अंदाज आहे.

तारिक रहमान यांची पत्नी डॉ. झुबैदा रहमान आणि मुलगी बॅरिस्टर झैमा यांच्यासह ढाक्याला पोहोचले. ढाक्याला पोहोचल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले, की ६,३१४ दिवसांनंतर बांगलादेशमध्ये आलो. हिंसाचाराचा सामना करणाऱ्या बांगलादेश आणि ‘बीएनपी’साठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी त्यांचे पुनरागमन झाले. या निवडणुका भारताच्या प्रादेशिक सुरक्षेसाठीदेखील महत्त्वाच्या आहेत. तारिक यांचे पुनरागमन भारतासाठी विशेष महत्त्वाचे आहे. विशेषतः भारतसमर्थक अवामी लीगला निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली आहे आणि खालिदा झिया निवर्तल्या आहेत. हे सर्व अशावेळी घडत आहे, जेव्हा बांगलादेश एका चौरस्त्यावर आहे. युनूस यांच्या नेतृत्वाखाली कट्टरपंथी इस्लामिक घटक उघडपणे सक्रिय आहेत आणि भारतविरोधी विष पसरवत आहेत. भारताची सर्वात मोठी चिंता ‘जमात-ए-इस्लामी’ आहे. ती पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ची आघाडी मानली जाते. शेख हसीना सरकारने बंदी घातलेल्या या पक्षाने गेल्या वर्षी हसीना यांना सत्तेतून परागंदा केल्यानंतर आपले राजकीय अस्तित्व पुन्हा स्थापित केले आहे. अलीकडील जनमत चाचण्यांवरून दिसून येते, की तारिक यांच्या ‘बीएनपी’ला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, तर त्यांचा माजी मित्र ‘जमात-ए-इस्लामी’ आता निवडणुकांची जोरदार तयारी करत आहे.

अलीकडेच ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत ‘जमात-ए-इस्लामी’च्या विद्यार्थी संघटनेच्या आश्चर्यकारक विजयामुळे भारताच्या चिंता आणखी वाढल्या. अशा परिस्थितीत भारत ‘बीएनपी’ला तुलनेने उदारमतवादी आणि लोकशाहीवादी पर्याय मानत आहे. भारत आणि बांगलादेशातील संबंध ऐतिहासिकदृष्ट्या ताणलेले असताना आणि शेख हसीना यांच्या उपस्थितीत भारताला तोच चांगला पर्याय वाटत आहे. तारिक यांच्या परतण्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि ‘बीएनपी’ पुढील सरकार स्थापन करण्यास सक्षम होईल. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय नागरिक पक्षाने (एनसीपी) आरोप केला आहे, की ‘बीएनपी’अवामी लीग नेत्यांना आपल्यात सामील करत आहे. हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशने भारताशी जवळचे संबंध राखले आणि चीनशी संतुलन राखले, तर पाकिस्तानपासून स्पष्ट अंतर राखले. तथापि, युनूस सरकारच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली. बांगलादेशने स्वतःला भारतापासून दूर केले आणि पाकिस्तानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तरीही भारताला वाटते, की ‘बीएनपी’ सत्तेत आल्यास बांगलादेशचे परराष्ट्र धोरण पुन्हा बदलेल.

अलीकडेच, भारत आणि ‘बीएनपी’ यांच्यातील संबंधांमध्ये पुनर्बांधणीची चिन्हे दिसू लागली आहेत. १ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालिदा यांच्या गंभीर प्रकृतीबद्दल सार्वजनिकरीत्या चिंता व्यक्त केली आणि भारताकडून मदत देऊ केली. त्याला ‘बीएनपी’ने कृतज्ञतेने प्रतिसाद दिला. वर्षानुवर्षे ताणलेल्या संबंधांमध्ये हे एक दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण राजकीय पाऊल मानले गेले. भारतासाठी एक स्वागतार्ह दिलासा म्हणजे तारिक यांचे युनूस सरकारशी मतभेद आहेत. त्यांनी अंतरिम सरकारच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. युनूस यांच्याकडे दीर्घकालीन परराष्ट्र धोरण निश्चित करण्याचा अधिकार नाही, अशी टीका करून त्यांनी ‘जमात-ए-इस्लामी’शी निवडणूक युतीची शक्यता नाकारली. या वर्षाच्या सुरुवातीला, तारिक रहमान यांनी ‘बांगलादेश फर्स्ट’ नावाची परराष्ट्र धोरणाची रूपरेषा सादर केली. ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या घोषणेपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात होते. त्यांनी घोषित केले, ‘ना दिल्ली ना पिंडी, बांगलादेश प्रथम’. याचा अर्थ बांगलादेश भारत आणि पाकिस्तान यापैकी कुणाच्याही जवळ जाणार नाही. तारिक बोगुडा-६ (सदर) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तारिक यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे कट्टरपंथी घटक नाराज आहेत. निवडणुकीपूर्वी ‘बीएनपी’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’मध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बांगलादेशसोबत वेगाने बिघडणारे संबंध भारतासाठी तीनस्तरीय आव्हान उभे करतात. यामुळे चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेवर असुरक्षितता आणि घुसखोरीचा धोका वाढेल. सीमेपलीकडे भारतविरोधी शक्तींचे तळ स्थापन होण्याचा धोकादेखील आहे. भारत आणि बांगलादेशमधील तणावाचा फायदा पाकिस्तान आणि चीन घेत आहेत. बांगलादेशमध्ये पाकिस्तानचा सहभाग वाढतो आहे. या वर्षी जूनमध्ये चीनमधील कुनमिंग येथे चीनचे उपपरराष्ट्रमंत्री सन वेइडोंग आणि बांगलादेश आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांमधील त्रिपक्षीय बैठकीने भारतासाठी चिंता निर्माण केली. त्यानंतर २०२४ च्या अखेरीस पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाने बांगलादेशच्या बंदराला अभूतपूर्व भेट दिली. चीन मुहम्मद युनूस सरकारसोबत आपले संबंध सतत मजबूत करत आहे. कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिले तरी द्विपक्षीय संबंधांची सध्याची स्थिती भारतासाठी अत्यंत प्रतिकूल आहे.

Comments
Add Comment