डॉ. वीणा सानेकर, मायभाषा
अनेक मुलांकडे सभाधीटपणाचा अभाव असल्याने ती बाहेर विशेष बोलत नाहीत आणि विशेष बोलकी नसल्याने शाळेत ती मागेमागेच राहतात. त्यांना बोलते करण्यासाठी वेळीच प्रयत्न केले नाहीत, तर ती अशीच घुमी राहण्याची शक्यता जास्त असते, अशा वेळी त्यांना बोलके करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मुलांना बालनाट्यातून सामावून घेणे आणि हे करताना मुलांची मायभाषा त्यांना खूप मदत करू शकते.
एकतर घरातच बोलली जाणारी भाषा त्यांच्या अंगवळणी सहज पडते आणि मुले उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ शकतात. स्वानुभवातून मी हे सांगू शकते. माझ्या मुलीला तिची अभिव्यक्ती करताना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून मी तिला लहानपणीच बालनाट्यात गुंतवले. प्रारंभी मी तिला वेगवेगळी बालनाट्ये दाखवायला सुरुवात केली. ‘दुर्गा झाली गौरी’मधली गाणी गुणगुणताना गंमत म्हणजे ती दुर्गाच अधिक व्हायची. सुरुवातीला प्रेक्षकाच्या भूमिकेतच असणारी माझी मुलगी इतकी रमली, की ते पाहून मी तिला बालनाट्याच्या कार्यशाळेत पाठवायला सुरुवात केली.
छोटे-छोटे संवाद लिहिणे, प्रत्यक्ष नाटकातील दृश्य साकारणे, सर्वांसोबत समूहात सहभाग घेणे, शब्दोच्चार, आवाज आणि लयीचे भान या सर्व गोष्टींची जाण तिला बालनाट्य प्रशिक्षणातून आली. भीती ही गोष्ट कशी घालवायची, याचा जादुई मार्ग तिला सापडला होता. हळूहळू नाटुकले रचण्याचा तिला छंदच जडला. तिची भाषा घडण्याची प्रक्रिया इतक्या वेगाने सुरू झाली, की ती आपसुकच कविताही रचू लागली. बालनाट्यातून घडलेल्या तिच्या जडणघडणीत राजू तुलालवार सरांचे श्रेय मोठे आहे.
लेकीचा भाषाविकास पाहिल्यावर एकूण अभ्यासक्रमाशी शालेय जीवनातच बालनाट्याचा संबंध जोडण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. शिक्षकांनी आपल्या अध्यापन प्रक्रियेत बालनाट्याचा योग्य आणि कल्पक उपयोग केला तर अधिक चांगल्याप्रकारे ते मुलांपर्यंत विषय पोहोचवू शकतात. त्यामुळे मुलांसाठी कार्यशाळा आयोजित करणे जितके उपयुक्त तितकेच पालकांनी मुलांना नाटक दाखवणेही तितकेच महत्त्वाचे! मुलांच्या भाषाविकासाचा गाभा समजून घेतला तर तिथपर्यंत पोहोचण्याच्या विविध वाटा पालक शिक्षकांना शोधता येतील. बालनाट्य ही अशीच एक आनंददायी आणि खेळकर वाट!