कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच आढळले हिरवे नर कासव
श्रीवर्धन : श्रीवधर्नच्या कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच हिरवे कासव आढळले, असून त्यास जीवदान देण्यात आले. तालुक्यातील बागमांडला येथे नवीन फेरीबोट जेट्टीच्या बाजूला वाहून आले आणि अडकून पडलेल्या, ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला वनविभाग आणि कासव संवर्धन प्रकल्पाच्या सदस्यांनी जीवदान दिले.
कासवाला सुरक्षीतपणे पाण्यात सोडण्यात आले. कोकण किनारपट्टीवर ग्रीन सी प्रजातीचे नर कासव किनाऱ्याला वाहून येण्याची ही पहिलीच घटना असल्याने, वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दरम्यान बाणकोट ते बागमांडला दरम्यान फेरीबोट चालवली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथील नवीन फेरीबोट जेटीच्या बाजूला एक भले मोठे कासव वाहून आल्याचे आणि ते चिखलात अडकून पडल्याचे तिथे काम करणाऱ्या आकाश सुरेश पाडलेकर यांच्या निसर्दशनास आले. त्याने लागलीच ही माहीती कांदळवन विभाग अलिबागच्या वन अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने कर्मचारी पाठवून कासवाची पहाणी केली असता. तिथे ग्रीन सी या प्रजातीचे नर कासव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे कासव आकाराने खूपच मोठे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १८९ सेंटीमेटर लांब ६२ सेंटीमीटर रुंद असे पूर्ण वाढ झालेले शेपटी असलेले नर कासव असल्याचे वनकर्मचाऱ्यांच्य लक्षात आले.
शरीरावर कोणत्याही जखमा अथवा खुणा नव्हत्या. हे कासव पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर एका बाजूला वाहून आले असावे आणि नंतर तिथे पाणी नसल्याने अडकून पडले असावे असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाण्यात सोडण्यापूर्वी कासवाच्या शरीरावर कोणतीही जखमा नाही ना अखवा त्याला कुठली इजा नाही याची खात्री करून घेतली आणि त्यानंतरच त्याला पाण्याजवळ नेऊन सोडण्यात आले. पाण्याजवळ ठेवले असता, काही क्षणातच कासव पाण्याखाली जात खोल समुद्रात निघून गेले. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या माद्या प्रजनन काळात अंडी टाकण्यासाठी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात येत असतात. क्वचित प्रसंगी ग्रीन टर्टल प्रजातीच्या माद्याही किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. पण ग्रीन टर्टल प्रजातीची कासवे त्यातही नर कासवे किनारट्टीवर फारशी येत नाहीत, त्यामुळे हे नर कासव किनाऱ्याला कसे लागले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.






