पुणे महानगरपालिकेची यंदाची निवडणूक केवळ सत्तास्थापनेसाठीचीच नाही, तर अनेक दिग्गजांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. १५ हून अधिक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि तुल्यबळ उमेदवारांमध्ये थेट 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना दिसत असला, तरी शिवसेना (दोन्ही गट), मनसे आणि काँग्रेसने अनेक ठिकाणी चौरंगी लढतींचे चित्र निर्माण केले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांमध्ये चुरशीचे आणि प्रतिष्ठेचे मुकाबले रंगणार आहेत. काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक थेट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तर काही प्रभागांमध्ये पक्षांतर करून बंडखोरी केलेल्या उमेदवारांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. एकूण १५ हून अधिक प्रभागांमध्ये तुल्यबळ उमेदवारांमधील लढतीमुळे मतदारांना रोमांचक सामन्यांचा अनुभव मिळणार आहे. मुख्यत: भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्यातील थेट टक्कर दिसून येत असली, तरी शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट), मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही काही ठिकाणी लढत त्रिकोणी किंवा बहुरंगी करत आहेत. कल्याणीनगर वडगावशेरी येथे भाजपचे माजी नगरसेवक नारायण गलांडे आणि राष्ट्रवादीचे सचिन भगत यांच्यात मोठी लढत अपेक्षित आहे. दोघांचाही या भागात चांगला प्रभाव आहे. गोखलेनगर वाकडेवाडी भाजपच्या रेश्मा भोसले आणि राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट यांच्यातील मुकाबला चुरशीचा होणार आहे. दत्ता बहिरट यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. औंध बोपोडी भाजपचे सनी निम्हण आणि राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे यांच्यात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही उमेदवारांचा स्थानिक पातळीवर मजबूत आधार आहे.
सूसा बाणेर पाषाण येथे दोन रोमांचक लढती पाहायला मिळणार आहेत. एकीकडे भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे, तर दुसरीकडे भाजपचे लहू बालवडकर आणि राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर या दोन युवा नेत्यांमध्ये सत्तेचा थेट संघर्ष रंगणार आहे. अमोल बालवडकर यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवले. शिवाजीनगर मॉडेल कॉलनी भाजपच्या निवेदिता एकबोटे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे. निवेदिता एकबोटे यांना भाजपकडून परत एकदा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत रोमांचक होणार यात शंका नाही. कोरेगाव पार्क मुंढवा येथे त्रिकोणी लढत होणार आहे. भाजपचे उमेश गायकवाड, राष्ट्रवादीचे सुनील ऊर्फ बंडू गायकवाड आणि मनसेचे बाबू वागस्कर यांच्यात चुरशीची होणार आहे. वानवडी साळुंखे विहार काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि भाजपचे अभिजित शिवरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर अभिजीत शिवरकर हे जगताप यांना पक्षात घेतल्याने नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले. त्यामुळे ही लढत रंगतदार होईल. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कसबा पेठ कमला नेहरू रुग्णालय परिसर भाजपचे गणेश बिडकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे प्रणव धंगेकर यांच्यात हायव्होल्टेज मुकाबला बघायला मिळणार आहे. सहकारनगर पद्मावती येथेही दोन रोमांचक लढती होणार आहेत. राष्ट्रवादीचे सुभाष जगताप विरुद्ध भाजपच्या वीणा गणेश घोष, तर दुसऱ्या पॅनेलमध्ये भाजपचे महेश वाबळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे आबा बागूल यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. बालाजीनगर आंबेगाव कात्रज या प्रभागात एकीकडे राष्ट्रवादीचे दत्तात्रेय धनकवडे आणि भाजपचे संदीप बेलदरे यांच्यात चुरस, तर दुसऱ्या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश कदम, ठाकरे सेनेचे वसंत मोरे, शिंदे सेनेचे स्वराज बाबर आणि भाजपचे व्यंकोजी खोपडे यांच्यात बहुरंगी सामना रंगणार आहे.
कोंढवा बुद्रूक येवलेवाडी भाजपच्या रंजना टिळेकर आणि राष्ट्रवादीचे गंगाधर बधे यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे. नाना पेठ, रविवार पेठ शिवसेनेच्या प्रतिभा धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांच्यात महिलांमध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे अशोक हरणावळ उभे आहेत. मनसे आणि शिवसेनेकडूनही घाटे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या लढतींकडे लक्ष आहे. भाजपचे योगेश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप जऱ्हाड यांच्यात थेट सामना रंगणार आहे. पक्षांतर आणि स्थानिक समीकरणांमुळे ही लढत भारी होणार आहे.
या लढतींमुळे पुणे महापालिका निवडणूक अत्यंत रंजक आणि निकराची होणार आहे. माजी नगरसेवकांच्या आमने-सामने येण्यामुळे जुने वैर आणि नवी समीकरणे समोर येत असून, बंडखोर उमेदवारांनीही अनेक प्रभागांमध्ये लढत त्रिकोणी किंवा चौरंगी करून मत विभागणीची शक्यता वाढवली आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






