मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत राजकीय वातावरणात ठिणगी टाकली आहे. "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे मुंबईबाहेर किती वेळा गेले आहेत? यांचा जीव फक्त मुंबईतच अडकला आहे आणि त्यामागे केवळ मुंबई महानगरपालिकेची तिजोरी हस्तगत करून भ्रष्टाचार करण्याचा हेतू आहे," अशी घणघाती टीका फडणवीस यांनी केली. मुंबई महानगरपालिकेवर (BMC) ताबा मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरे गटांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमागे जनसेवा नसून सत्ता आणि पैसा हेच मुख्य कारण असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. "मुंबईबाहेरील महाराष्ट्राशी या दोन्ही नेत्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यांना केवळ मुंबईत सत्ता हवी आहे जेणेकरून भ्रष्टाचाराचे जुने पर्व पुन्हा सुरू करता येईल," असे फडणवीस म्हणाले. मुंबईच्या विकासापेक्षा तिजोरीवर अधिक लक्ष असल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरेंच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर विरोधकांकडून होणाऱ्या 'लोकशाही धोक्यात' असल्याच्या टीकेचाही फडणवीसांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरेंवर प्रहार करताना ते म्हणाले, "जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले होते, तेव्हा लोकशाही कुठे गेली होती? तेव्हा त्यांना लोकशाहीचा विसर पडला होता का?" स्वतःच्या सोयीनुसार लोकशाहीची व्याख्या बदलणाऱ्या नेत्यांनी भाजपला उपदेश देऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
अकोला : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काहीही घडू शकते' याची प्रचिती अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आली आहे. विचारधारेच्या पलीकडे जाऊन ...
बुरखेवाली महापौर चालेल, पण उत्तर भारतीय नको?
मुंबईतील राजकारणात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या 'मराठी विरुद्ध परप्रांतीय' या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना थेट शब्दांत सुनावले आहे. "जर उद्धव आणि राज ठाकरे मराठी आहेत, तर मी काय उत्तर प्रदेश किंवा पाकिस्तानमधून आलो आहे का? मी नागपूरचा आहे आणि मी सुद्धा मराठीच आहे," अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंच्या प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणावर कडाडून हल्ला चढवला. मराठी अस्मितेचा मक्ता केवळ ठाकरेंकडेच नसल्याचे सांगताना फडणवीस यांनी आकडेवारीचा दाखला दिला. "मुंबईत भाजप विधानसभेच्या १५ ते १६ जागा जिंकतो. जर आम्हाला मराठी माणसाची साथ नसती, तर हे यश शक्य झाले असते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही सर्व हिंदूंनी एकत्र राहण्याच्या विचाराचे आहोत, असे सांगतानाच त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र लढण्याची तयारी दर्शवली, मात्र इतर राज्यांतील लोकांना मारहाण करण्याचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दमही दिला.
'बुरखेवाली महापौर'वर मौन का?
व्होटबँकेच्या राजकारणावरून फडणवीसांनी ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेचे वाभाडे काढले. "वारीस पठाण जेव्हा 'बुरखेवाली महापौर होईल' असे म्हणतात, तेव्हा ठाकरे बंधूंच्या तोंडातून शब्दही फुटत नाही. पण कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय महापौराचे नाव काढताच ठाकरे गट लगेच तुटून पडतो. हा दुटप्पीपणा केवळ मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी सुरू आहे," असा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला.
मुंबईच्या विकासाचा ५ वर्षांचा प्लॅन सज्ज
राजकारणा पलीकडे जाऊन मुंबईच्या कायापालटासाठी महायुती सरकार कटीबद्ध असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. "आम्हाला मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास करायचा आहे. येणाऱ्या ५ वर्षांत मुंबईतील पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी तब्बल १७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाकरेंच्या भावनिक राजकारणाला आता विकासाच्या मुद्द्याने उत्तर देण्याची रणनीती फडणवीसांनी स्पष्ट केली आहे.
बाळासाहेबांचा ब्रँड आता एकनाथ शिंदेंकडेच!
"महाराष्ट्र आणि मुंबईत फक्त एकच खरा ब्रँड आहे, तो म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! दुर्दैवाने राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आज तो ब्रँड उरलेला नाही, बाळासाहेबांचा खरा वारसा आणि ब्रँड आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना आरसा दाखवला.
दोन पिढ्यांचा संघर्ष आणि बंडखोरीचा अंत
यावेळची महापालिका निवडणूक ऐतिहासिक ठरणार असल्याचे संकेत फडणवीसांनी दिले. "साधारणपणे प्रत्येक निवडणुकीत एक नवी पिढी तयार होते, पण या निवडणुकीत दोन पिढ्या एकत्र रिंगणात उतरल्या आहेत, हा एक मोठा राजकीय बदल आहे," असे ते म्हणाले. निवडणुकीतील बंडखोरीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जरी सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली असली, तरी आता बंडखोर शांत झाले असून महायुती पूर्ण ताकदीने मैदानात आहे.
बाहेरच्या नेत्यांची गरज नाही, मोदींचे नावच पुरेसे!
मुंबईच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली स्वतंत्र रणनीती आखली आहे. फडणवीस म्हणाले की, "आम्ही घराणेशाहीला थारा दिलेला नाही आणि एकाच घरातील अनेकांना उमेदवारी दिलेली नाही. विशेष म्हणजे, या निवडणुकीसाठी आम्हाला योगी आदित्यनाथ, अमित शाह किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी प्रत्यक्ष आणण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांच्या मनात मोदीजींचे स्थान इतके पक्के आहे की, त्यांचे केवळ 'नाव' निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पुरेसे आहे." मुंबईत होऊ घातलेल्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा महायुतीला कोणताही फटका बसणार नाही, असा दावा फडणवीसांनी केला. "या युतीचा काहीही फायदा होणार नाही, कारण मुंबईची जनता आता विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देत आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले. विरोधकांच्या खेळींना न घाबरता भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना मुंबईवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र त्यांनी निर्माण केले.






