मुंबई : नववर्षाच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. उत्तर भारतात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून तापमानचा पारा ही घसरत चाला आहे, याचा मोठा परिमाण हा महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. पंजाब, चंदीगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, झारखंडसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये नवीन थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच उत्तरेकडील थंडीचा परिणाम विदर्भात जाणवू लागला असून विदर्भात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गोंदियामध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. तसंच धुळे आणि नागपूरमध्येही तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत थंडीचा कडाका राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यात मागील तीन दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात थंडीपासून काहीसा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पुण्यातील हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
याखेरीज वर्धा येथे ८.४ अंश सेल्सिअस, अमरावती येथे ९.३ अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी येथे९.६ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक किमान तापमान बुलढाणा व यवतमाळ येथे प्रत्येकी १५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. मागील काही दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होऊन किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस विदर्भात किमान तापमान कमीच राहण्याची शक्यता आहे.






