पूजा काळे, मोरपीस
वर्ष बदलताना आलेल्या एका अनुभवाची आठवण ताजी आहे. काही बाबतीत काहीं सज्जनांचा कायम असलेला होरा पाहता याचं पुढं काय होणार? या जाणिवेनं मी अस्वस्थ होते. एका वर्षात काय बदलतं यावर भाष्य करणारे विद्वान पाहिले, की सांगावस वाटतं वर्षांचं काय घेऊन बसलात राव! पृथ्वीवर दर दिवशी, दर तासाला नव्या घडामोडी घडत असतात. यासाठी निसर्ग नियमावलीची खूप उदाहरण देता येतील. आतापर्यंतच्या काळात स्वभाव, मूड बदलण्याचे स्वातंत्र्य आणि तंत्र केवळ मानवाकडे होते. कोणे एकेकाळी जगावर त्याची हुकूमत होती; परंतु आजचं चित्र पूर्णतः वेगळं आहे. ते पाहून आपल्या तोंडचं पाणी पळालंय. आयुष्याला शिस्त लावणारा, आपल्या नियोजित चक्राला नियम लावणारा निसर्ग विक्राळ रूप धारण करतो. जनमानसाला हानी पोहोचवितो. पूर, महापूर, दुष्काळ तर कुठे भूस्खलनात किड्यामुंग्यांसारखी माणसं मरताना पाहून यातना होतात. दिवसेंदिवस निसर्गाची होत असलेली अवकृपा चिंतेचा विषय बनत चाललीय.
निसर्गचक्राच्या नियमांना फाटा देत बदल घडवून आणणारे आपण निसर्गाच्या लहरीपणाला दूषण देत आहोत. प्रथम सरणारं वर्ष नवं आव्हान देऊन गेलं. वर्षारंभी पावसाने लावलेल्या हजेरीने संकटाची चाहूल लागली. गेल्यावर्षी पावसाचा कहर बघता पूर, महापूराने दाणादाण उडवली. त्या आठवणी ताज्या असताना जानेवारीत आलेला अवकाळी पाऊस कुरघोडी करायला, आपल्याला शहाणं करायला बिनबुलाए मेहमान सारखा आला हे विशेष अभ्यासण्यासारखे आहे. याची कारणं पाहता काही निष्कर्ष काढले. अभ्यास सांगतो, शहराची लोकसंख्या बेसुमार वाढते तेव्हा शहरातली झाडं कमी होत जातात. शिवाय शहराच्या आसपास असणारी शेतजमीन नापीक होत जाते. त्या जागी सिमेंट काँक्रीटचं जंगल वाढतं. अशातचं पोलादी, लोखंडी सळ्या माना वर काढतात. मागील बरींच वर्ष हे चित्र आपण पाहत आहोत. अशा अचंबित घटनांनी मेंदूच्या पार चिंध्या होतात. इमारतींसाठी काळ्याभोर डांबरी रस्तावर असलेला वाहनतळ, बाल्कनीची खोली, धातूच्या चौकटी तावदानावर काचा लावून उभ्या केलेल्या शोभिवंत खिडक्या म्हणजे वरवरच्या सौंदर्यासाठी करत असलेली निसर्गहानी, जी पर्यायाने आपल्या पायावर धोंडा मारण्याचे काम करते आहे. वनस्पती मातीपेक्षा जास्त काळ उष्णता साठवून ठेवणारे ॲल्युमिनियम, पोलादासारखे धातू सर्वात जास्त घातक मानले जातात. औद्योगिक विकासाच्या नावाखाली आपण सगळी मूल्य पायदळी तुडवत आहोत. यामध्ये गावचा विचार करता गावातल्या जमिनी आणि पिकांना मुबलक पाणीपुरवठा होतो; परंतु शहराच्या आसपास तसं होताना दिसत नाही. हिवाळ्यात शहराबाहेरील भागात तापमान जास्त असतं.
काही वेळेस तापमानातला फरक दहा ते बारा अंश सेल्सिअस एवढा असतो. अशात शहर सभोवतालच्या परिसरात विशेषतः वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेस पावसाचे प्रमाण वाढते. आजूबाजूस असलेल्या शेती, ग्रामीण परिसरापेक्षा शहरात उष्णता जास्त असते. याचं मुख्य कारण म्हणजे काँक्रिटीकरण आणि पोलादीकरण होय. जे पाण्याची वाफ होण्यामुळे गारव्याला प्रतिबंध करणारे धातूजन्य पदार्थ होत. ग्रामीण भागातील जमिनीवर सूर्याचे किरण पडले असता मातीसह वनस्पती, गळून पडलेली पान तापतात म्हणजे सूर्याकडून येणारी ऊर्जा शोषून घेतात. यामुळे पाण्याची वाफ होते. ती बाहेर पडते आणि पुन्हा हवेत मिसळते. यामुळे तापलेला पृष्ठभाग थंड व्हायला मदत होते; परंतु शहरात मोकळी माती, मुबलक झाडं नसल्याने सूर्यामुळे रस्ते, इमारती वारंवार तापतात. आसपास पाणी नसल्याने तापण्याची क्रिया वेगाने घडते. हवा तापल्याने पाण्यापेक्षा लवकर पोलाद काँक्रीट तापतात. त्यांचा काळा पृष्ठभाग उष्णता शोषून घेण्यात अग्रणी ठरतो. बहुतेक शहरात कुळकुळीत डांबरी रस्ते आणि त्या रंगाच्या इमारती पाहावयास मिळतात. अर्थातच त्या जास्त उष्णता शोषून घेतात. ती साठवून ठेवतात आणि हळूहळू वातावरणात सोडतात. अशातच शहराचे तापमान आजूबाजूच्या ग्रामीण भागापेक्षा वाढतं.
मंडळी शहर आणि ग्रामीण भागात हा एवढाचं फरक आहे असं नाही, तर अभ्यासातून इतर गोष्टी पुढे आल्या आहेत. खूप विस्तारलेली शहरं ढग, पावसावरही परिणाम करतात. मोठ्या शहरात जमा झालेल्या उष्णतेमुळे स्थानिक हवामानात फरक पडतो. हवेत नवे प्रवाह निर्माण होतात. शहरावर सदैव कायमस्वरूपी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. कारण इथली हवा तापून वर जाते तिच्या जागी ग्रामीण भागातील कमी गरम हवा वर येते. ती तापते. पुन्हा वर जाते. मान्सून नसल्याने तिथे याचे वेगळे परिणाम जाणवतात. त्या ठिकाणच्या परिसरात अस्पष्ट आलेले ढग गोळा होतात आणि बाजूच्या ग्रामीण भागापेक्षा शहरावर अधिक प्रमाणात अधिक तीव्रतेचा पाऊस पडतो असे वॉशिंग्टन डीसीचा अभ्यास सांगतो. एकूणच मानवनिर्मित गोष्टींचा प्रभाव निसर्ग चक्रावर परिणाम साधतो हे आपल्या लक्षात येतं. खासगीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण या सगळ्याची उद्दिष्ट सफल होण्यासाठी असली तरी मानवनिर्मित सोयी सुविधांच्या गोष्टींचे समीकरण ताळमेळ राखू शकत नाही. तेव्हा अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं भाग पडतं. वेळ काळ ओळखून या सगळ्यांवर नियंत्रण ठेवले नाही तर ऋतूच्या वेळापत्रकात वारंवार बदल होत राहील आणि नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागेल. निसर्गाची कायम भिती बाळगत जगणं मुश्कील होईल. निसर्ग आपला मित्र या नात्याने मित्रत्वाच्या काही खुणा राखून ठेवल्या, तर उद्याचा उषःकाल वैभवसंपन्न होईल यात तिळमात्र शंका नाही.