Friday, January 9, 2026

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट झाले आहेत. अवघ्या तासाभरात झालेल्या या स्फोटांमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे. यानंतर मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आग मोठी असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे.  पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग फक्त आपत्कालीन सेवांपुरते सुरू ठेवले आहेत. नागरिकांना घटनास्थळापासून दूर सुरक्षित अंतरावर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लागोपाठ झालेले स्फोट आणि मोठी आग यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आग लागल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमधील भीतीची तीव्रता आणखी वाढली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे तसेच सहकार्य करण्याचे आणि सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमध्ये पॅसिफिक केमिकल कंपनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मोठी आग लागल्याची चर्चा आहे. पण अधिकृत माहिती आग नियंत्रणात आल्यानंतर तपास करुन दिली जाईल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आगीचे स्वरुप मोठे असल्यामुळे अग्निशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आसपासच्या शहरांतून आणखी मदत मागवण्यात आल्याचे समजते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा