मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत उबाठासोबत युती केल्यामुळे तसेच महत्वाचे प्रभाग आपल्याला न मिळाल्याने नाराज झाल्याने मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसेचे उपनेते आणि चेंबूरमधील माजी नगरसेवक राजा चौगले यांनीही राज ठाकरे यांची साथ सोडली. उबाठासोबतची युती मान्य नसल्याने राजा चौगुले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजा चौगुले हे राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना सोडून मनसेमध्ये आले होते आणि त्यानंतर पुन्हा उबाठामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा मनसेमध्ये आले होते. तेव्हापासून मनसेचे नेते म्हणून ते पक्षात कार्यरत होते. परंतु उबाठासोबतची युती मान्य न झाल्याने तसेच पक्षाने कोणत्याही आपल्याला विचारात न घेतल्याने त्यांनी मनसेला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला.
मनसेचे प्रभादेवीतील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थित प्रवेश करत काही तास उलटत नाही तोच मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला. मनसेचे नेते राजा चौगुले यांनी मनसेला सोडचिठी देत शिवसेनेत प्रवेश केला. चेंबूर,तिळक नगर भागात चौगुले यांचा दबदबा असून मनसेच्या विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासमवेत राजा चौगुले होते. मनसेच्या स्थापनेपासून ते राज ठाकरे यांच्या सोबत होते. पुढे सन २००७मध्ये त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केला होता आणि सन २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजा चौगुले हे निवडून आले होते. चेंबूरमधून निवडून आल्यानंतर त्यांनी विधी समितीचे अध्यक्षही भुषवले होते. त्यानंतर २०१३नंतर त्यांनी पुन्हा मनसेमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते मनसेच्या संघटनात्मक बाबींमध्ये सक्रीय होते. पक्षाच्या प्रत्येक सभा आणि बैठकांमध्ये ते सक्रियपणे आपला सहभाग नोंदवत होते.
मनसेची उबाठासोबत युती न करता मनसेने स्वतंत्र निवडणूक लढवावे, कारण उबाठासोबत निवडणूक लढवल्यास याचा फायदा उबाठाला अधिक होईल आणि मनसेला कमी जागा मिळतील. तसेच मनसेला केवळ भीक म्हणून जागा दिल्यामुळे राजा चौगुले पक्षाच्या कार्यपध्दतीवर नाराज होते. बाळा नांदगावकर हे भावनिक होवून दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा विचार करत असले तरी पक्षासाठी भावनिक न होता प्रॅक्टीकल असायला हवे असे त्यांचे ठाम मत होते आणि त्यांनी असे मत वारंवार मांडलेही होते. त्यामुळे ठाकरे बंधूंमधील युतीच्या दरम्यान राजा चौगुले यांनाही विश्वासात न घेतल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे.






