Thursday, January 8, 2026

बंगालच्या खाडीत धोक्याची घंटा; चीन, पाकिस्तान, बांग्लादेशची भारताविरोधात हालचाल

बंगालच्या खाडीत धोक्याची घंटा; चीन, पाकिस्तान, बांग्लादेशची भारताविरोधात हालचाल

नवी दिल्ली : सध्याच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे भारताच्या सुरक्षिततेसमोर नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. पाकिस्तानसोबत भारताचे संबंध कायमच तणावपूर्ण राहिले असून, चीनसोबतही सीमारेषेवर वेळोवेळी संघर्षाची स्थिती निर्माण होतच असते. अमेरिकेने चीनवर लादलेल्या टॅरिफनंतर भारत-चीन संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे काही का दिसले होते. मात्र, ही सुधारणा केवळ राजनैतिक चर्चांपुरतीच मर्यादित राहिल्याचे आता स्पष्टपणे दिसून येत आहे.

सीमेवर भारतावर दबाव कायम ठेवण्याची रणनीती चीनकडून सुरूच असून, आता त्याचे प्रतिबिंब सागरी क्षेत्रातही दिसू लागले आहे. बंगालच्या खाडीत आजवर भारताचे वर्चस्व राहिले असले, तरी चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन घुसखोरी करून या भागात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. चीनकडून सातत्याने बंगालच्या उपसागरात युद्धनौका पाठवल्या जात असून, पाकिस्तानलाही चीनकडून पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता बांगलादेशही या समीकरणात सक्रिय होत असल्याने भारताची चिंता आणखीणच वाढली आहे.

मागील काही काळापासून चीनने बंगालच्या उपसागरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी आक्रमक पावले उचलली आहेत. या भागात चिनी नौदलाची सर्वेक्षण जहाजे, गुप्तचर जहाजे तसेच पाणबुड्यांची सतत वर्दळ दिसून येत आहे. फ्रान्समधील गुप्तचर संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, एक चिनी संशोधन जहाज भारतीय सागरी हद्दीजवळ बंगालच्या उपसागरात सक्रिय असल्याचे आढळून आले.यामुळे संरक्षण यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

चीनच्या वाढत्या हेरगिरीमुळे सागरी सुरक्षेबाबत भारताची चिंता वाढतच चालली आहे. फ्रिगेट आणि सहाय्यक जहाजांसह पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्हीची जहाजे अंदमान समुद्रातून पुढे सरकत असल्याचे निरीक्षणात आले आहे. याशिवाय चीनने बांगलादेश नौदलाला आधीच दोन पाणबुड्या पुरवल्या असून, बंगालच्या उपसागरातील चिनी रणनीतीत बांगलादेश महत्त्वाचा घटक ठरत आहे. हे निश्चित

या सर्व घडामोडींवर भारत सरकार आणि संरक्षण यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे. भारत शांतपणे परिस्थितीकडे पाहत नसून, संभाव्य धोक्यांचा सखोल आढावा घेत तयारीही करत आहे. याच पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात अणुशक्तीवर चालणाऱ्या आयएनएस अरिहंत पाणबुडीतून के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.

तसंच भारतीय नौदल पश्चिम बंगालमधील बांगलादेश सीमेजवळ असलेल्या हल्दिया येथे नवीन सागरी तळ उभारण्याच्या तयारीत आहे. या पायाभूत सुविधांमुळे पूर्व किनाऱ्यावरील भारताची सागरी क्षमता अधिकच मजबूत होणार आहे.

एकीकडे चीनकडून सातत्याने कुरापती सुरू असताना, दुसरीकडे भारतही कोणतीही तडजोड न करता सज्ज होत असल्याचे चित्र आहे. बंगालच्या खाडीत सध्या घडामोडींना वेग आला असून, येत्या काळात या सागरी पट्ट्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment