मुंबई (प्रतिनिधी) : सीबीएसईने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक व सामाजिक समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आता सीबीएसईने एक पाऊल उचलले आहे. या सेवेचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला असून तो १ जूनपर्यंत असणार आहे.
विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षांना मानसिक संतुलन चांगले ठेवून सामोरे जाता यावे, हा उद्देश आहे. ताणाचे व्यवस्थापन, प्रभावी अभ्यास पद्धती व भावनिक आरोग्य या संदर्भातील माहिती सीबीएसईच्या ‘www.cbse.gov.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे मानस-सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, विद्यार्थी व पालकांनी या सर्व सहाय्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीबीएसईने केले आहे.
टेली-कौन्सेलिंग सेवा उपलब्ध : विद्यार्थी आणि पालक ७३ प्रशिक्षित तज्ज्ञांच्या पॅनेलशी संवाद साधू शकतात. यात सीबीएसई संलग्न शाळांतील प्राचार्य, समुपदेशक, विशेष शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञांचा समावेश आहे. त्यातील ६१ समुपदेशक भारतातील असून, १२ समुपदेशक नेपाळ, जपान, कतार, ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यरत आहेत. ही सेवा स्वयंसेवी तत्त्वावर दिली जाते.






