व्हेनेझुएला हे दक्षिण अमेरिकेतील राष्ट्र पुन्हा एकदा जागतिक केंद्रस्थानी आले. यावेळी त्याची कारणे आहेत ती आर्थिक अस्थिरता, सामाजिक असंतोष आणि देशांतर्गत तीव्र झालेला गंभीर पेचप्रसंग. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सिल्विया यांना अमेरिकेने जेरबंद केले आणि आता त्या देशाचे भवितव्य अमेरिकेच्या हाती आहे. त्याचे तेलसाठेही अमेरिकेच्या कब्जात आहेत.
व्हेनेझुएलाच्या संदर्भात असे म्हणता येईल की, तेथे राजकीय संकट आणि लोकशाहीच्या नावाखाली बाह्य शक्तीनी केवळ खुला हस्तक्षेप केला. सत्तापरिवर्तनाला प्रोत्साहन देण्याचे धोरणही अवलंबिले. व्हेनेझुएलावरील अमेरिकेचा हल्ला म्हणजे अमेरिकेची दादागिरी. तेथे अमेरिकेने कमांडो पाठवले आणि मादुरो यांना बेड्या घालून अमेरिकेत आणले. असेच धोरण अमेरिकेने सद्दाम हुसेन यांच्याबाबतीतही राबवले होते आणि त्यांना अमेरिकेने वेगळ्या प्रकारे जगाला त्यांच्यापासून धोका आहे असे दाखवून ठार मारले. जे सद्दाम हुसेन यांच्याबाबतीत अमेरिकेने केले तेच आता निकोलस मादुरो यांच्याबाबतीत करत आहे. अर्थात निकोलस मादुरो यांच्या बाबतीत अमेरिका त्यांच्यावर सरळ दहशतवादी ठरवू शकत नाही, तर व्हेनेझुएलाकडे असलेले अनिर्बंध तेल साठे हस्तगत करून तिथे आपले नियंत्रण मिळवायचे धोरण आखून अमेरिकेने व्हेनेझुएलावर ही कारवाई केली. व्हेनेझुएला हा देश एकेकाळी लॅटिन अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देश होता. तिथे तेल साठे प्रचंड होते. मात्र सध्या हा देश अन्नाचा तुटवडा, अतिमहागाई आणि औषधांचा तुटवडा यांसारख्या संकटाशी झुंजतो आहे. इथे हिंसाचार पराकोटीला पोहोचला आहे. सरकारी आणि विरोधी पक्षांमध्ये तणाव ताणला आहे. या परिस्थितीचा फायदा अमेरिकेने उचलून निकोलस मादुरा यांना उचलले आणि आपल्याकडे आणले. तेलसाठ्यांवर आता अमेरिकेचे नियंत्रण आहे. याचा अर्थ देश आता अमेरिकेच्या ताब्यात गेला. भारताने व्हेनेझुएलातील स्थिती संवाद आणि घटनात्मक माध्यमातून सोडवता येईल असे सांगितले. पण अमेरिका त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही.
व्हेनेझुएलातील स्थितीचा फायदा उचण्यासाठी अमेरिकेने त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह उचलून आपल्याकडे आणणे आणि डांबून ठेवणे यामुळे खरा पेच निर्माण झाला आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे, की अमेरिकन तेल कंपन्या आता व्हेनेझुएलातील समृद्ध तेलसाठ्याचा ताबा घेतील. एकदा तेलावरील निर्बंध संपले, की अमेरिकेला व्हेनेझुएलातील तेलाचा अनिर्बंध उपभोग घेता येईल. भारत आणि व्हेनेझुएला यांचे संबंध तेलाच्या दष्टीने महत्त्वाचे आणि दीर्घ काळापासून आहेत. कारण व्हेनेझुएला हा आपला तेलाचा भरवशाचा पुरवठादार होता. पण अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ले करण्याला पार्श्वभूमी युक्रेन युद्धाची आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले, त्यानंतर ९ दिवसांनी अमेरिकन फौजांनी काराकसवर हल्ले केले आणि मादुरो आणि त्यांच्या पत्नींना बंदी करून अमेरिकेत आणले. सद्दामच्या वेळेला अमेरिकेने असा दावा केला होता की सद्दामला मारून आम्ही जगाला संकटातून मुक्त केले आहे. फरक इतकाच होता की पूर्वी अमेरिका संपूर्ण जगात आपल्या दादागिरीने सरकारे उलथवून पाडायची आणि त्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाची परवानगी लागायची. आता तशी काहीच परिस्थिती नाही. संयुक्त राष्ट्संघ ही थिजलेली संस्था झाली आहे आणि अमेरिका कोणत्याही देशावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रसंघाची परवानगी काही घेत बसत नाही. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून जागतिक संबंधांच्या परिणांमाना वेगळेच वळण आले. वास्तविक जग आज अशा अवस्थेत आहे की लहानशा देशातील लहान घटनाही ताकदवान राष्ट्राला हादरवून टाकू शकते. व्हेनेझुएलातील अमेरिकेचे आक्रमण त्याच प्रकारातील आहे. आता राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिल्विया कुठे आहेत हेच आम्हाला माहिती नाही असे व्हेनेझुएलाच्या तेलमंत्र्यानी म्हटले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्याकडे दोघेही पती-पत्नी जिवंत असल्याचे पुरावे मागितले आहेत. मात्र ट्रम्प यांची नजर व्हेनेझुएलातील तेल साठ्यांवर आहे हे लपून राहिलेले नाही.
लॅटिन अमेरिकेतील सर्वात श्रीमंत मानला जाणारा व्हेनेझुएला हा देश होता. पण त्याची ही श्रीमंती त्यांच्यासाठी अभिशाप आहे. अर्थात या देशाचे गैरव्यवस्थापन, राजकीय संघर्ष आणि सामाजिक अशांती यांच्याशी झुंज देत आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादल्यामुळे त्याला आपल्याकडील तेलाचा पुरेपूर उपयोग करून घेता येत नाही. एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे. व्हेनेझुएलाच्या पतनामागे केवळ अमेरिकाच नव्हे तर अर्थव्यवस्थेची विफलता त्याला कारण ठरली आहे. ह्यूगो चावेझ अध्यक्ष असताना लोकांना सरकारी तिजोरीतून वाट्टेल ती खैरात दिली जायची. त्यामुळे देश कंगाल झाला. मादुरो यांनी स्थिती सुधारली आणि हीच स्थिती अमेरिकेला नकोशी वाटली आणि त्यामुळे व्हेनेझुएलाचे पतन झाले. व्हेनेझुएलाचे पेट्रोल क्षेत्राला अमेरिकेकडून निर्बंध लादण्यात आले आहेत आणि त्यात अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. नेवल ब्लॉकेड या नावाखाली अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या निर्बंधामुळे व्हेनेझुएलाची तेल निर्यात खूपच कमी झाली आहे. पूर्वी तो तेल निर्यातीवर चालत होता. १९९०च्या दशकात व्हेनेझुएलाचा तेल निर्यातीतील वाटा ४ टक्के होता. आज तो खूपच कमी आहे. व्हेनेझुएला इतिहासातील सर्वात आव्हानात्मक स्थितीचा सामना करत आहे आणि अशा परिस्थितीत शांततेची हाक अत्यंत महत्त्वाची आहे. व्हेनेझुएलातील नेते जागतिक आवाज ऐकतील आणि स्थिती आणखी प्रक्षोभक होणार नाही याकडे लक्ष देतील अशी आशा आहे. भारताने व्हेनेझुएलातील शांतता आणि स्थैर्याची हाक दिली आहे आणि भारताचा आवाज शातता, स्थेर्य आणि लोकशाही प्रक्रिया यासाठी महत्त्वाचा मानला जावा. ट्रम्प यांच्या नापाक इराद्यांना व्हेनेझुएलाने तसेच प्रत्युत्तर द्यावे अशीच सामान्य व्हेनेझुएलातील लोकांची इच्छा आहे. अर्थात याबरोबर भारत सरकारची भारतीयांप्रती भूमिका महत्त्वाची आहे आणि त्यांची सुरक्षितता यांना सरकारने प्राधान्य द्यायला हवे. भारताने व्हेनेझुएलात मानवतावादी मदत पोहोचवण्यास तितकेच प्राधान्य दिले आहे.






