शिवसेना-मनसेची एकी; राष्ट्रवादीचा रुसवा
ठाणे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत काहीही आलबेल नाही. मविआमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उबाठा आणि मनसे एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एका बाजूला दुर्लक्षित झाला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमले म्हणाले, "आमच्याकडून कोणत्याही स्वरूपाची बिघाडी झालेली नाही. शिवसेना-उबाठा गट आणि मनसे युतीबाबतची घोषणा आम्हाला नुकतीच कळली. जागा वाटपातही आमच्या विश्वासात घेतले गेले नाही, ही बाब गंभीर आहे."
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना-उबाठा गट आणि मनसे एकत्र येण्याने महाविकास आघाडीसाठी हा एक नवा धक्का आहे. आमले यांच्या मते, स्थानिक कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचलेला नाही, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन कमी झाले आहे. "नैसर्गिक महाविकास आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना-उबाठा गट आणि काँग्रेस यांची आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला," असे आमले यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी मनसेबरोबर चर्चा करून जागा वाटपाचे फॉर्म्युला निश्चित केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासह बैठक घेतली. आमले यांनी सांगितले की, बिघाडी मनसेमुळे झाली की अन्य कारणामुळे, हे पक्षालाच ठाऊक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट वाटप करत समाजातील विविध घटकांना प्राधान्य दिले असून, स्थानिक भूमिपुत्र, पश्चिम महाराष्ट्र माथाडी कामगार, मुस्लिम समाज आणि दलित समाज यांना उमेदवारी मिळाली आहे. आमले यांनी सांगितले की, "सर्व समावेशक उमेदवारीमुळे लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल."






