आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही दिलासा
मुंबई : कुलाबा विधानसभा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाने नार्वेकर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांना राज्य निवडणूक आयोगाने क्लीनचिट दिली आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या जनता दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले, याप्रकरणी तक्रारीनंतर ‘ए’ वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठविलेल्या अहवालात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कृती नियमाला धरुन जरी असली तरी प्रशासकीय कार्याला अनुकूल नव्हती, असे मत नोंदवले आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची कृती कायद्याच्या दृष्टीने योग्य असली तरी व्यावहारिक आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. मात्र वेळेनंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जात नाही हा नियम सर्वत्र लागू असल्याने जाधव यांनी केलेल्या कृतीचे राज्य निवडणूक आयोगाने समर्थन केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पाच वाजण्याची वेळ संपण्यापूर्वी कृष्णा जाधव यांच्या दालनात जे उमेदवार होते त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर जाधव यांनी पाच वाजता आपल्या दालनाचे दरवाजे बंद करीत त्यानंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. उमेदवारांना टोकन देण्यात आले होते असे म्हटले जात असले तरी त्या टोकनवर प्रिसायडिंग ऑफिसरची सही नसल्याने ते टोकन ग्राह्य मानले जात नाहीत, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
प्रभाग २२५, २२६, २२७ हे पालिकेच्या ‘ए’ प्रभागांतर्गत येतात. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. अर्ज दाखल करण्याच्यावेळी नार्वेकर तेथे उपस्थित होते. त्यांनी दबाव आणल्याचा आरोप आप व अन्य उमेदवारांनी केला आहे. याच प्रभागातून जनता दल आणि आम आदमी पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. ३० डिसेंबर रोजी या दोन्ही पक्षाचे उमेदबार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महापालिका ‘ए’ प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात गेले असता, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी उमेदवारी अर्ज नाकारले. त्याविरोधात उमेदवारांनी राज्य महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. आम्ही दुपारीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचलो होतो, तेथील गोंधळ पाहता निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या सहायकांनी उमेदवारांना मार्गदर्शन करून, अर्ज स्वीकारायला हवे होते आणि सुरळीत प्रवेशासाठी परिसर मोकळा करायला हवा होता. मात्र, सत्ताद्यारी नेत्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापासून रोखल्याचा आरोप या उमेदवारांनी केला होता. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणतीही तक्रार आलेली नाही, त्यांनी कुठेही प्रक्रियेत अडथळा आणल्याचे दिसत नाही, असे सांगत नार्वेकर यांना क्लीनचीट दिली आहे.






