पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उबाठा गटाचे अधिकृत आणि बंडखोर उमेदवार शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करताना दिसले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. कोथरुडमध्ये भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. प्रभाग ९ मधील उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार आणि पूजा सुतार, तसेच नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. प्रभाग ११ मधून अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीप गायकवाड यांनीही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
चंद्रकांत पाटील यांनी सर्व नव्याने प्रवेश केलेल्या सदस्यांचे पुणे येथील निवासस्थानी स्वागत करताना सांगितले, “भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडले गेले आहेत. आता या महत्त्वाच्या प्रवेशांमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही फक्त सुरुवात आहे, आगामी काळात भाजप महापालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवेल.”
पक्षांतर केलेल्या उमेदवारांमुळे उबाठापुढे पेच : अर्जमाघारीची मुदत उलटल्यामुळे ईव्हीएमवर उबाठा गटाच्या उमेदवारांची नावे दिसतील, ज्यांच्या पुढे ‘मशाल’ चिन्ह आणि मतदानाचा पर्याय उपलब्ध राहील. मात्र पक्षांतर केलेले उमेदवार प्रचारात “भाजपला मतदान करा, आमच्या नावासमोरील किंवा मशाल चिन्हासमोरील बटण दाबू नका” असे आवाहन करताना दिसतील. त्यामुळे कोथरुडमध्ये आगामी मतदानादरम्यान प्रचंड राजकीय उलथापालथ आणि मतदारांची निवड यावर लक्ष केंद्रित राहणार आहे.






