पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात गदारोळ झाला होता. शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणाऱ्या या पुस्तकात जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर होता. या मजकुराविरोधात महाराष्ट्रात प्रामुख्याने पुण्यात हिंसक पडसाद उमटले होते. अखेर २२ वर्षांनंतर या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'ने जाहीर माफी मागितली आहे.
जेम्स लेन अमेरिकेत कार्यरत असलेला इतिहास आणि धर्म या विषयाचा प्राध्यापक आहे. लेनचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ झाला. पुस्तकासाठी पुण्यातील काही इतिहास संशोधकांनी मदत केल्याचा आरोप करत पुण्यात संभाजी बिग्रेड आक्रमक झाली. संभाजी ब्रिगडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला केला. या हल्ल्याला आणि निदर्शनांना ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग देण्यात आला. या प्रकरणात २००३ मध्ये छत्रपती उदयनराजे यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पत्र पाठवले होते. अखेर २२ वर्षांनंतर पत्राला उत्तर देत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जाहीर माफी मागितली.
'ऑक्सफर्ड विद्यापीठ' ही शैक्षणिक संस्था 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस' चालवते. लेनचे 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'ने प्रकाशित केले होते. आता २२ वर्षांपूर्वीच्या घटनेसाठी 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'ने छत्रपती उदयनराजे आणि महाराष्ट्राची माफी मागितली आहे. एक निवेदन प्रसिद्ध करून 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'ने माफी मागितली आहे.






